Thu, Jun 27, 2019 17:45होमपेज › Konkan › तिलारी घाट रस्त्याचे भाजपकडून तातडीने उद्घाटन

तिलारी घाट रस्त्याचे भाजपकडून तातडीने उद्घाटन

Published On: Feb 10 2018 11:17PM | Last Updated: Feb 10 2018 10:43PMदोडामार्ग : प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाममंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी जिल्हा दौर्‍यात तिलारी घाटाच्या उद्घाटनासाठी मंत्री महोदयांची वाट बघू नका, तर रस्त्याचे उद्घाटन करा, असे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी  सकाळी या घाटाचे भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन केले. हे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार होते. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये या घाटाच्या उद्घाटनावरून श्रेयवाद रंगण्याची शक्यता आहे.

तिलारी घाटाच्या दुरुस्तीसाठी तिलारी जलविद्युत केंद्र व पाटबंधारे खाते यांनी मिळून 3 कोटी 34 लाख रुपये निधी दिला. त्यानंतर 7 कि.मी.चा घाट सा.बां.विभाग कोल्हापूर यांच्याकडे वर्ग झाला आणि दिवाळीनंतर घाट दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. तीन महिने हा घाट दुरुस्तीमुळे बंद होता. घाटाचे डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन आठ दिवस झाले, असे असताना पालकमंत्री दीपक केसरकर यांना उद्घाटन करण्यास वेळ नसल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम लांबवणीवर पडला होता. शुक्रवारी ना. चंद्रकांत पाटील यांचे जि.प.सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी या घाटाबाबत लक्ष वेधताच त्यांनी तत्काळ कोल्हापूर व सिंधुदुर्ग बांधकाम विभागाला घाट खुला करा, असे आदेश दिल्याने भाजपच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी सकाळी श्रीफळ वाढवून घाट वाहतुकीस खुला केला.