Tue, May 21, 2019 22:10होमपेज › Konkan › बारा कोटींचा अपहार

बारा कोटींचा अपहार

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:54PMचिपळूण : प्रतिनिधी

शहरातील सेवाभावी ब्राह्मण नागरी सहकारी पतसंस्थेत व्यवस्थापक, संचालक, पिग्मी एजंट यांनी मिळून तब्बल 12 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेच्या अध्यक्षांनीच या तिघांविरोधात गैरव्यवहाराचा ठपका ठेवत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी संबंधित तिघांवर अपहाराचा गुन्हा नोंदविला आहे. 

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवाभावी ब्राह्मण नागरी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश ऊर्फ बापू काणे यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार पतसंस्थेत 11 कोटी 62 लाख 6 हजार 232 रुपये रकमेचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्था व्यवस्थापक राजेंद्र वसंत लोवलेकर, संचालक संजय अशोक डिंगणकर व पिग्मी एजंट श्रेया संजय डिंगणकर यांच्याविरोधात बुधवारी (दि. 31) चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार दि. 1 जानेवारी 2011 ते 6 सप्टेंबर 2017 या कालावधीत वरील तीन संशयितांनी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. त्यामध्ये तिन्ही संशयितांनी संगनमताने हा गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे. त्यापैकी सभासद, ठेवीदारांकडून पिग्मीची जमा होणारी रक्कम पतसंस्थेच्या खात्यात न भरता ती संगनमताने स्वत:कडे ठेवली. तसेच व्यवस्थापक राजेंद्र लोवलेकर यांनी संचालक मंडळाची कोणतीही मंजुरी व स्वाक्षरी न घेता बोगस कर्जप्रकरणे केली.