Wed, Mar 27, 2019 01:59होमपेज › Konkan › दोडामार्गात हत्ती हटाव मोहीम

दोडामार्गात हत्ती हटाव मोहीम

Published On: Jun 19 2018 10:47PM | Last Updated: Jun 19 2018 10:14PMसावंतवाडी :प्रतिनिधी 

विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यातील सुरू असलेल्या रानटी हत्तीचा उपद्रव कायमचा दूर करण्यासाठी हत्ती हटाव व हत्ती पकड मोहीम हाती घेण्याचे आदेश अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधान वन सचिव विकास खार्गे यांना दिल्याची माहिती भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी दिली. तेली यांनी लेखी निवेदन वनमंत्र्यांना सादर केले होते.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हत्ती प्रश्‍न वनमंत्र्यांच्या  निदर्शनास निवेदनाद्वारे तेली यांनी आणला असता, त्यांनी यासंदर्भात तत्काळ कार्यवाहीचे निर्देश प्रधान वनसचिवांना दिले.त्यानुसार प्रधान वनसचिव खार्गे यांनी कोल्हापूर मुख्यवन संरक्षकांना हत्ती पकड व हत्ती हटाव मोहिमेसाठी लागणारी कर्नाटक राज्यातील प्रशिक्षित टीमला संपर्क साधून त्यांच्या येण्याच्या वेळापत्रक व अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश दिले. या टीमला हायर करण्याचा आदेश वनमंत्रालयाने दिल्यामुळे आता हेवाळे भागात धूमशान घालणार्‍या हत्तींचा कायमचा बंदोबस्त होणार आहे.

हत्तींचा वाढता उपद्रव पाहता शेतकर्‍यांना शेती बागायत करायची की पडिक ठेवायची, असा प्रश्‍न येथील भुमीपुत्रांना पडला होता. या हत्तींना हटविण्यासाठी नुकतेच उपोषण आंदोलन सुरु केले होते. याची दखल घेत राजन तेली यांनी ही बाब वनमंत्र्यांच्या निदर्शनास आणली असता आजच्या बैठकीत हत्ती हटाव मोहिम राबविण्याबाबत निर्णय झाला असल्याचे तेली यांनी सांगितले.

हत्तींकडुन आत्तापर्यत झालेल्या नुकसानीची मिळणारी तुटपंजी नुकसानभरपाईकडेही तेली यांनी लक्ष वेधले असता वाढीव भरपाई बाबत वनमंत्रालयाने एक कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीचे अध्यक्ष स्वत: प्रधान सचिव खार्गे असल्यामुळे याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवुन वाढीव भरपाईबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वाासन खार्गे यांनी दिल्याचेही तेली यांनी सांगितले. तूर्तास हत्तींना नुकसानीपासुन दूर ठेवण्यासाठी लागणारे फटाके आदी साहित्य पुरविण्याचे निर्देश वनसचिवांनी दिल्याचे तेली यांना सांगितले.