Wed, Mar 20, 2019 22:55होमपेज › Konkan › विद्युततारा तुटून पडल्याने धावाधाव

विद्युततारा तुटून पडल्याने धावाधाव

Published On: Dec 17 2017 1:27AM | Last Updated: Dec 16 2017 10:41PM

बुकमार्क करा

खारेपाटण : वार्ताहर

खारेपाटण आठवडी बाजारात शनिवारी दुपारी 2 वा.च्या सुमारास विद्युत प्रवाहित तारा तुटून पेट घेत खाली कोसळल्या. अचानक झालेल्या या प्रकाराने विक्रेते व ग्राहकांची धावाधाव झाली. तारा विद्युत प्रवाहित असल्याची ओरड झाल्याने जो तो धावू लागला. या धावपळीत काहीजण लगतच्या गटारात कोसळले. मात्र, तारा तुटल्यानंतर विद्युत प्रवाह खंडित झाल्याने कुणालाही इजा झाली नाही. या प्रकाराने खारेपाटणमधील जीर्ण विद्युततारांची समस्या प्रकर्षाने पुढे आली. 

खारेपाटण आठवडी बाजारात शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे विक्रेते व ग्राहकांची वर्दळ होती. दुपारी 2 वा.च्या सुमारास मच्छीमार्केट ते लिक्कीदरम्यान 100 मी.  रस्त्यालगत असलेल्या विद्युततारेवर नारळाचे सुकलेले झावळ पडले. त्यामुळे तुटलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने त्यांनी पेट घेतला. तारा पेटून बाजारातील विक्रेत्यांच्या स्टॉलवर पडल्याने एकच धावाधाव झाली. तारा विद्युत प्रवाहित असल्याचा समज होऊन शॉक लागेल या भीतीने पळापळ सुरू झाली. या धावपळीत काहीजण गटारात कोसळलेही. प्रसंगाचे गांभीर्य राखत भाजी विक्रेते किशोर पिसे यांनी तातडीने महावितरणशी संपर्क  साधला. शहरातील इतर नागरिकांनीही आठवडी बाजारात धाव घेतली.  

महावितरणचे कर्मचारीही बाजारात पोहोचले. तार तुटल्यानंतर विद्युत प्रवाह खंडित झाला हे लक्षात आल्याने नागिरकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. विद्युत प्रवाहित तार जर खाली कोसळली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

खारेपाटणातील वीज तारा झाल्या जीर्ण

खारेपाटण गावातील वीज तारा जीर्ण झाल्या आहेत. तारा तुटून पडल्याने ही समस्या प्रकर्षाने पुढे आली. खारेपाटणमधील या प्रकारानंतर अनेकांनी मुंबईतील एल्फिस्टन रेल्वे पुलावर झालेल्या दुर्घटनेची आठवण करून दिली.

वीज तारा जीर्ण असतानाच लगतची झाडे तोडलली नसल्याने असे प्रकार होत आहेत. महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. यापूर्वी खारेपाटणमध्ये महावितरणकडे कंत्राटी कारभार असलेल्या पराडकर नामक कर्मचारी  अचानक वीजप्रवाह चालू झाल्याने खाली कोसळले होते. त्यामुळे खारेपाटणमधील वर्दळीच्या भागातील वीजवाहिन्या तातडीने बदलण्यात याव्यात तसेच तारा तुटून पडू नये यासाठी उपाययोजना करावी,अशी मागणी होत आहे.