Mon, Jan 27, 2020 10:44होमपेज › Konkan › विद्युतीकरणाने रेल्वेचे २०० कोटी वाचणार

विद्युतीकरणाने रेल्वेचे २०० कोटी वाचणार

Published On: Jul 01 2019 1:11AM | Last Updated: Jun 30 2019 10:32PM
रत्नागिरी : दीपक शिंगण

कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम आतापर्यंत जवळपास 40 टक्के पूर्ण झाले आहे.  सध्या युद्धपातळीवर सुरू असलेले हे काम पूर्णत्त्वास गेल्यानंतर कोकण रेल्वेच्या सध्या इंधनावर होणार्‍या खर्चाचा विचार करता सुमारे 200 कोटी रुपये इतकी बचत होणार आहे. विद्युतीकरणाचे उर्वरित 60 टक्के काम येत्या दीड वर्षात पूर्ण होईल, अशी माहिती ‘कोरे’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी येथे एका अनौपचारिक कार्यक्रमात बोलताना दिली.

कोकण रेल्वेच्या रायगडमधील  रोहा ते कर्नाटकातील ठोकूर या 738 कि.मी.च्या संपूर्ण मार्गाचे ‘पॅच डबलिंग’ तसेच विद्युतीकरणाचे काम सध्या एकाच वेळी वेगाने सुरू आहे. रोहा ते वेर्णा (गोवा) आणि वेर्णा ते ठोकूर (कर्नाटक) अशा दोन टप्प्यात हे काम सुरू आहे. आतापर्यंत विद्युतीकरणाचे काम जवळपास 40 टक्के पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित कामासाठी डिसेंबर 2020 अशी ‘डेडलाईन’ निश्‍चित करण्यात आली आहे. या कामासाठी 1100 कोटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे. सध्या या मार्गावरील गाड्या डिझेलवर चालविल्या जातात. यासाठी रेल्वेला वर्षाकाठी 300 कोटी रुपयांचे इंधन लागते. विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा खर्च 100 कोटींपर्यंत खाली येऊ शकणार आहे. म्हणजेच कोकण रेल्वे महामंडळाच्या सध्याच्या इंधनावरील खर्चात दर वर्षाला 200 कोटी रुपयांची बचत होणार आहे. आतापर्यंत  मंगळुरूजवळील ठोकूर ते  बिंदूर स्थानकानजीकच्या बिजूरपर्यंत 105 कि. मी. अंतरातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.