Fri, May 24, 2019 02:32होमपेज › Konkan › गोळवण येथे वीज पोल कोसळून कामगाराचा मृत्यू

गोळवण येथे वीज पोल कोसळून कामगाराचा मृत्यू

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 10:12PM

बुकमार्क करा

विरण  : वार्ताहर

विद्युत पोल बदलण्याचे काम करत असताना ओढणी तुटून पोलासह जमिनीवर कोसळल्याने दिलीप किसन उईटे  (25, रा.मध्यप्रदेश घनवाई, ता.नानागंज, जि. मांडला) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गोळवण-खर्‍याचे टेंब या भागात  दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. गोळवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना औषधोपचार करण्यासाठी  नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव यांनी सांगितले.

गोळवण भागात बी.व्ही.जी. कंपनीच्या वतीने जीर्ण लोखंडी विद्युत पोल बदलून सिमेंटचे पोल बसविणे व लाईन ओढण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी 30 कामगार काम करत आहेत. दुपारी 3.30 वा.  च्या सुमारास काम सुरू असताना सिमेंटच्या पोलावर चढलेले दिलीप उईटे हे  पोल उभा करण्यासाठी बांधण्यात आलेली ओढणी (ताणनी) तुटल्याने जमिनीवर कोसळले. यात त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली.

तर शरीराच्या अन्य भागाची मोडतोड झाली. याठिकाणी असलेले एजन्सीचे मुकादम गणेश डगे यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. सुभाष लाड, दादा नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांना उपचारासाठी गोळवण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत कट्टा दूरक्षेत्राचे पोलिस श्री. आंबेरकर,  श्री. तांबे, श्री. सराफदार यांनी रुग्णालयात भेट देत घटनेची माहिती घेतली. कट्टा  येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता सुजीत शिंदे, तंत्रज्ञ किरण पाटील यांनी भेट दिली.

मृत दिलीप उईटे  यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला. तर मध्यप्रदेश येथील त्याच्या कुटुंबीयांना या  घटनेबाबत माहिती देण्यात आली.