Fri, Nov 16, 2018 01:08होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यात १,२३० घरांचे ‘सौभाग्य’ उजळले!

रत्नागिरी जिल्ह्यात १,२३० घरांचे ‘सौभाग्य’ उजळले!

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 9:56PMरत्नागिरी : प्रतिनिधी

देशातील नागरिकांना 24 तास वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी 25 सप्टेंबर रोजी सौभाग्य योजना सुरू केली. या योजनेंतर्गत डिसेंबर-2018 पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे अभियान सुरू केले आहे. महावितरणच्या रत्नागिरी विभागातही या योजनेचे काम जोमात  सुरू असून, आतापर्यंत 1,230 ग्राहकांना वीज जोडणी दिली आहे 

अन्न, वस्त्र व निवार्‍याबरोबरच आता वीजही एक मूलभूत गरज बनली आहे. विजेशिवाय विकासाची कल्पना करता येत नाही. मात्र, अनेक घरांत आजही वीज पोहोचलेली नाही. विजेपासून वंचित असलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने सौभाग्य योजना सुरू केली आहे. केवळ शहरच नव्हे, तर दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील खेडेपाडे आणि वाड्यावस्त्यांमधून राहणार्‍या शेवटच्या घटकांनाही वीज जोडणी देऊन आधुनिक भारताच्या विकासात समाविष्ट करून घेण्याची संकल्पना म्हणजेच केंद्र शासनाची प्रधानमंत्री हर घर सहज बिजली योजना अर्थात ‘सौभाग्य’ या योजनेतंर्गत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.  

महावितरणच्या रत्नागिरी विभागातही ही योजना उत्स्फूर्तपणे राबविण्यात येत आहे. जिल्हाभरातून 2,754 प्रस्ताव महावितरणला प्राप्त झाले आहेत. यापैकी 1,230 जणांना वीज जोडणी देण्यात आली आहे. 

योजनेसाठी मनुष्यबळ वाढविणार : पेठकर

सौभाग्य योजनेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रस्ताव दाखल झालेल्यांना टप्प्याटप्प्याने वीज जोडणी देण्यात येत आहे. या योजनेतून लवकरात लवकर वीज जोडणी देण्यात यावी, यासाठी मनुष्यबळ वाढविण्यात येणार आहे. वीजवाहक तारा, पोल यांची कमतरता असणार्‍या उपकेंद्रात टेंडर काढून साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर पेठकर यांनी सांगितले.