Tue, Mar 19, 2019 15:39होमपेज › Konkan › डिसेंबरपर्यत घराघरात पोहचणार वीज

डिसेंबरपर्यत घराघरात पोहचणार वीज

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 18 2018 8:48PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना सौभाग्य’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ दि. 25 सप्टेंबर 2017 रोजी केला.  या योजनेंतर्गत महावितरणच्यावतीने दि. 31 डिसेंबर 2018 पर्यत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात 100 टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.  सौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना ही वीजजोडणी विनाशुल्क देण्यात येणार असून इतर लाभार्थ्यांना मात्र 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे 500 रुपये संबंधित लाभार्थ्यांने त्याच्या बिलातून 10 टप्प्यात भरावयाचे आहेत. 

मोफत वीजजोडणीसाठी लाभार्थी कुटुंबाची पात्रता 2011 च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्‍चित करण्यात येणार आहे.  योजनेत वीजपुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीजबील भरणे बंधनकारक आहे. मात्र थकबाकीमुळे कायमचा वीजपुरवठा खंडित झालेली घरे, तात्पुरत्या शिबिरातील स्थलांतरित होऊ शकणारी घरे तसेच शेतांमधील घरे या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉईट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात येणार आहे.  तसेच अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी पारंपरिक विद्युतीकरण करणे शक्य नाही, अशा घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात येणार आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदीम योजना व  इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुध्दा मोफत वीजपुरवठा देण्यात येणार आहे.

सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे 11 लाख 64 हजार 135 लाभार्थ्यांना वीजपुरवठा देण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी 7 लाख 67 हजार 939 लाभार्थ्यांना पारंपरिक पध्दतीने तर 21 हजार 56 लाभार्थ्यांना अपारंपरिक पध्दतीने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. दारिद्रयरेषेखालील घरे व सौभाग्य योजनेत पात्र घरांना पूर्वी मंजूर झालेल्या पंडीत दिनदयाल ग्राम ज्योती योजनेंतर्गत राज्यातील 3 लाख 96 हजार 196 घरांना वीजजोडण्या देण्याचे काम सुरू आहे.