Thu, Dec 12, 2019 09:36होमपेज › Konkan › राणे समर्थक सदस्यांना काँग्रेसकडून व्हीप

राणे समर्थक सदस्यांना काँग्रेसकडून व्हीप

Published On: Dec 23 2018 1:09AM | Last Updated: Dec 22 2018 10:00PM
सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रिक्‍त झालेल्या विषय समिती सभापतिपदासाठी सोमवारी 24 रोजी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. मात्र, या निवडणुकीत कोणत्याही काँग्रेसच्या सदस्याने सहभागी होऊ नये, तसेच स्वाभिमानच्या सदस्यांना मतदान करू नये; अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा व्हीप प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशाने सरचिटणीस गणेश पाटील यांनी बजावला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीची उत्सुकता अजून ताणली गेली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचे सदस्य निवडून आले होते आणि काँग्रेस पक्षाकडे बहुमत असल्याने याच पक्षाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व विषय समिती सभापती विराजमान झाले होते. मात्र, त्यानंतर काही कालावधीने नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी जवळीक करत स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला. यामुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते स्वाभिमानमध्ये दाखल झाले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष म्हणून रेश्मा सावंत, उपाध्यक्ष म्हणून रणजित देसाई, वित्त व बांधकाम सभापती म्हणून संतोष साटविलकर, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, महिला व बालविकास सभापती म्हणून सायली सावंत आणि समाज कल्याण सभापतिपदी शारदा कांबळे हे काँग्रेसचे सदस्य विराजमान झाले होते.

माजी मुख्यमंत्री तथा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्या ‘सर्वांना समान संधी’ या धोरणाप्रमाणे प्रथम सत्रातील सव्वा वर्षाचा कालावधी संपल्यानंतर विद्यमान अध्यक्ष यांच्यासह विषय समिती सभापतींनी राजीनामे दिले आहेत.त्यामुळे रिक्‍त झालेल्या या सभापती पदांवर नवीन सभापती नेमण्यासाठी सोमवार 

24 डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. त्यादिवशी  विषय समिती सभापती निवड केली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या अधिकृत तिकिटावर निवडून आलेल्या सर्व सदस्यांना काँग्रेसचे प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार व्हिप बजावण्यात आला आहे. त्यामुळे आता 24 तारीखला सभापती निवडीवेळी काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या सर्वांना व्हिप बजावण्यात आले असल्याची माहिती सोमनाथ टोमके यांनी दिली.

मतदान केल्यास कारवाई : डॉ. जयेंद्र परूळेकर

सावंतवाडी पंचायत समितीच्या उपसभापती निवडीच्यावेळी व्हीप पोहोचला नसल्याची कारणे दिली गेली होती. परंतु, यावेळेस मात्र विरोधात जाणार्‍या सदस्यांना आपल्या सदस्यत्वास मुकावे लागणार असल्याचा इशारा डॉ. परूळेकर यांनी दिला आहे. दरम्यान, सावंतवाडी पंचायत समितीच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीमध्ये ज्या सदस्यांनी विरोधात मतदान केले, त्या सदस्यांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीमधून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले काका कुडाळकरसारखी अनेक मंडळी काँग्रेसमध्ये लवकरच दाखल होतील, असा विश्‍वास डॉ. परूळेकर यांनी व्यक्‍त केला आहे. सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. परूळेकर बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, बाळा नमशी, संदीप सुकी, चंद्रकांत राणे, अभय मालवणकर, आनंद परूळेकर आदी उपस्थित होते. मतदान करू नये; अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे या व्हिपमध्ये म्हटले आहे. याबाबतचा व्हिप सर्व जिल्हा परिषद सदस्यांना व्हॉटस् अ‍ॅपवर पाठविला असून, याबाबत वर्तमानपत्रातही प्रसिद्धी दिली जाणार आहे.