Thu, Dec 12, 2019 08:56होमपेज › Konkan › सभापतिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू

सभापतिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू

Published On: Dec 18 2017 2:35AM | Last Updated: Dec 17 2017 8:20PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी नगर परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्याचवेळी स्वीकृत सदस्य बदल सुद्धा होतील, असा अंदाज असल्याने त्यासाठीही इच्छुकांच्या धावपळींना वेग आला आहे.

रत्नागिरी नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे विषय समिती सदस्यांसह सभापतिपदी शिवसेनेचेच वर्चस्व आहे. सर्व पाचही सभापती शिवसेनेचेच असून दोन स्वीकृत सदस्य आहेत. सभापतींची मुदत 3 जानेवारी रोजी संपणार असून स्वीकृत सदस्य निवड 28 डिसेंबर 2017 रोजी झाल्याने येत्या 28 डिसेंबर रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे. पक्षाकडून स्वीकृत सदस्य उमेदवारी देताना सुरूवातीला 1 वर्षाचा कालावधी दिल्यास इतर इच्छुकांना या पदासाठी सामावून घेता येईल, असे ठरले होते. त्याचबरोबर प्रत्येक स्वीकृत नगरसेवकाला 20 महिन्यांचा कालावधी दिला जावा, असा पक्षात दुसरा प्रवाह आहे.

विषय समिती सभापतिपदी शिवसेनेच्या महिला सदस्यांचे वर्चस्व आहे. पाणी पुरवठा समिती सभापती वगळता महिला बालकल्याण, बांधकाम, आरोग्य सभापतीपदी पहिल्या वर्षासाठी महिला सदस्यांची वर्णी लागली आहे. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे राजेश सावंत कार्यरत होते. परंतु पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, सभापती पदाची एक वर्षाची ही मुदत 3 जानेवारी 2018 रोजी संपत आहे. त्यामुळे या निवडणुका 27 डिसेंबरला लागल्या आहेत स्वीकृत सदस्यांची मुदत 5 वर्षांची असली तरी पहिले वर्ष 28 डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. सुरूवातीला संजय साळवी, राजन शेट्ये, भाऊ देसाई आदी इच्छूक होते. इच्छूकांमधीलच किशोर मोरे आणि प्रशांत साळुंखे यांना पक्षाने ही संधी दिली.

सुरूवातीला त्यांची मुदत 1 वर्षाची असेल असे सांगितले होते. परंतु आता ही मुदत 20 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आल्याचे पक्षीय वर्तुळातून सांगितले जात आहे. संजय साळवी यांना उपजिल्हाप्रमुख पद तर भाऊ देसाई यांना उपशहरप्रमुख पद देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची या स्पर्धेतून आपोआप माघार झाली आहे. आता एकमेव राजन शेट्ये या स्पर्धेत उरले आहेत.