Tue, May 21, 2019 12:50होमपेज › Konkan › हॅट्ट्रिकचे स्वप्न पाहू नये : आ.सामंत

हॅट्ट्रिकचे स्वप्न पाहू नये : आ.सामंत

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 18 2018 10:15PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी 

पदवीधर मतदार संघाच्या रत्नागिरी जिल्ह्यात विरोधकांना प्रचार पत्रके वाटण्यासाठी माणसे मिळत नाहीत. त्यामुळे सर्वांचा पाठिंबा असल्याचे भासवून वातावरण निर्मिती केली जात आहे. परंतु, शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांना जिल्ह्यातील 16 हजार 222 पैकी 80 टक्के मते मिळतील, असा विश्‍वास शिवसेना उपनेते आ.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी ते पालकमंत्री रवींद्र वायकर यांचे मार्गदर्शन घेतले जात असल्याचेही सांगण्यास विसरले नाहीत. आता शिवसेनेचा फलंदाज चांगला असल्याने कोणीही हॅट्ट्रीकचे स्वप्न पाहू नये, असा टोला भाजप उमेदवाराला लगावला.

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक 25 जून रोजी होत आहे. शिवसेनेचे संजय मोरे, भाजपचे अ‍ॅड.निरंजन डावखरे आणि राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला या तीन उमेदवारांमध्येच खरी लढत होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आ.उदय सामंत यांनी खा.विनायक राऊत यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत घेऊन विरोधकांचा समाचार घेतला. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांच्या जीवावर शिवसेना ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मतदारसंघातील जिल्हानिहाय परिस्थिती सांगताना आ.सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातून शिवसेनेला 80 टक्के मते मिळतील, असा विश्‍वास व्यक्त केला. जिल्ह्यातील शिवसेनेचे काम, वर्चस्व विरोधकांना चितपट करण्यास पुरेसे आहे. त्यात विरोधी पक्षांना प्रचार पत्रके वाटण्यासाठी माणसेही मिळत नसल्याचा चिमटा काढला. जिल्ह्यातील एकूण मतदानापैकी मागच्या निवडणुकीत 62 टक्के मतदान झाले होते. यावेळी शिवसेनेने मतदार नोंदणी चांगली केली असून यावेळचे मतदान 72 ते 75 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असेही ते म्हणाले. त्यामुळे विजयाची हॅट्ट्रीक होण्याचे स्वप्न कुणी पाहू नये, असा टोला भाजपला लगावला. 

सिंधुदुर्गात 5 हजार 300 मतदार असून येथेही शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश येवून 70 टक्के मतदान शिवसेनेला होईल. खा.विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम सुरू असल्याचे सांगितले.

रायगडात आम्ही अतिविश्‍वास दाखवत नाही. या जिल्ह्यात तिन्ही पक्षांचे नेतृत्व मजबूत आहे. आमचे उमेदवार संजय मोरे हेसुद्धा या जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आहेत. त्यामुळे येथे एकमार्गी मतदान होणार नाही. तिन्ही उमेदवार ठाणे जिल्ह्यातील आहेत. महापौर असताना केलेल्या कामामुळे सेना उमेदवाराची प्रतिमा चांगली आहे. तर पालघरच्या लोकसभा पोट निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला सव्वादोन लाख मते मिळाली आहेत. यावरून येथे शिवसेनेलाच मतदान होईल. हा सर्व विचार करता शिवसेना विजयी होईल, असा विश्‍वास आ.सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, नगराध्यक्ष राहुल पंडित, तालुकाप्रमुख प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर उपस्थित होते.