Sun, Jul 21, 2019 14:08होमपेज › Konkan › कणकवलीकरांना शांतता हवी आहे!

कणकवलीकरांना शांतता हवी आहे!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी व्यापारीपेठ असलेल्या कणकवली नगरपंचायतीची निवडणूक खरेच शांततेत सुरू आहे आणि उरलेल्या आठ दिवसातही ती शांततेत सुरू राहणार यात शंका नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे प्रकार घडले आणि त्यातून दहशत निर्माण झाली तर हातात काहीच लागत नाही, हे यापूर्वीचा इतिहास पाहता स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे उमेदवारच शांतपणे आपापला प्रचार करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अपवाद वगळता कुणीही कुणावरही फारसे आरोप-प्रत्यारोप करतानाही दिसत नाही.

सध्याचे वातावरण पाहता कधीही नाही इतकी शांततेत यावेळची निवडणूक पार पडणार आहे असे ठामपणे सांगता येईल. 26 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जेव्हा लढती स्पष्ट झाल्या त्यानंतर प्रचारासाठी केवळ दहा दिवस शिल्लक राहिले. या दहा दिवसात घरोघरी जावून प्रचार करायचा आहे. अगदी प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंब प्रचारापासून चुकता कामा नये याची खबरदारी प्रत्येक उमेदवार घेत आहे. एवढेच नव्हे तर काही घरांमध्ये एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा जावून मतपरिवर्तन करण्याची आवश्यकताही उमेदवारांना माहीत आहे. त्यामुळे जो-तो उमेदवार बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मतदाराला भेटण्यात मग्न आहे.ही मग्नताच निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी उपयोगी ठरत असते.  निवडणूक आयोगाने अलिकडे प्रचाराचा कालावधी पूर्वीपेक्षा कमी ठेवण्यामागे हा एक सद्हेतू असावा, असे वाटते.

एक काळ असा होता की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात दहशतीचा मुद्दा हा प्रचाराचा मुद्दा असायचा. दहशतीच्या बाबतीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप व्हायचे. अर्थात अनेक राजकीय स्वरूपाचे गुन्हे त्या काळात पोलिस स्थानकांमध्ये दाखल व्हायचे. कणकवलीतही असे प्रकार घडायचे. परंतु त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे आता सर्वांनाच समजून चुकले आहे. एकीकडे मतदार आता अधिक समजदार बनले आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारांना स्विकारत नाहीत आणि दुसरीकडे अशा प्रकारांमुळे फक्त अंगावर केसीस वाढतात, वैयक्तिक नुकसानच होते हे आता कार्यकर्त्यांनाही समजू लागले आहे. या दोन कारणांमुळे आता राजकारणात शांतता प्रस्थापित होत आहे, असे म्हणण्यास वाव आहे. कणकवलीतही सध्या निवडणूक काळात अशी शांतता आहे, ही खूप समाधानाची बाब आहे.

मुळात कणकवली ही व्यापारीपेठ आहे. जिल्ह्यात सर्वात वेगाने विकसित होणारे हे शहर आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हे शहर ओळखीचे आहे. सिंधुदुर्गात जे हजारो पर्यटक पर्यटनासाठी येतात ते सुरूवातीला कणकवलीतच येतात. पुन्हा  माघारी परतताना त्यांची खरेदीही कणकवलीतच होते. त्यामुळे कणकवली विकसित शहर बनायला हवे. त्याशिवाय ते अधिक सुंंदर शहर निर्माण व्हायला हवे. अशा सुंदर आणि विकसित शहरासाठी शांत परिस्थिती कधीही पोषकच ठरते.

कणकवलीत सध्या निवडणूक काळात शहरात फेरफटका मारला असता एक बाब आवर्जुन दिसते ती म्हणजे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते गटागटाने घरोघरी जावून हात जोडून नम्रपणे मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. ज्येष्ठांसमोर वाकून नमस्कार करताना दिसतात. आपणाला मत का द्यावे, हे एखादा उमेदवार मतदाराला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याचवेळी तो प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका किंवा आरोप करण्याच्या फंदात पडत नाही. त्यामुळेच कणकवलीची ही निवडणूक निकोप वातावरणात सुरू आहे.

कणकवली हे शहर शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विकसित होत आहे. त्यामुळे मतदारही अधिक वैचारिक बनत चालला आहे. आपण कुणाला मतदान करणार याचा थांगपत्ता तो लागू देत नाही. प्रत्येक उमेदवार आणि त्याचे प्रचारक यांचे हसतमुखाने स्वागत करायचे आणि आपले अमूल्य मत आपल्या मनातील उमेदवाराला देवून मतदान केंद्रातून शांतपणे बाहेर पडायचे, असेच या मतदारांनी ठरविलेले आहे. खरे तर लोकशाहीला असेच अभिप्रेत आहे. खुल्या, निकोप वातावरणात मतदाराला आपल्या हव्या त्या उमेदवाराला मोकळेपणाने मतदान करता यावे, असेच वातावरण कणकवली शहरात सध्या दिसत आहे, ही लोकशाहीसाठी खूप समाधानाची बाब आहे.

- गणेश जेठे

 

Tags : Kankavli, Municipal Panchayat, Election,


  •