Mon, Mar 25, 2019 02:50
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › टेरवमधील कुटुंबावर आठ वर्षे बहिष्कार

टेरवमधील कुटुंबावर आठ वर्षे बहिष्कार

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 8:25PM

बुकमार्क करा
चिपळूण : खास प्रतिनिधी

तालुक्यातील टेरव येथे सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी दहाजणांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल आठ वर्षे एका कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार या घटनेने उघड झाला आहे.

या प्रकरणी टेरव राधाकृष्णवाडी येथील राजेंद्र प्रभाकर कदम (44) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याच वाडीतील दहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये संभाजी जानबाराव कदम, हनुमंत केशवराव कदम, रघुनाथ तातोजीराव कदम, बळवंत दाजीराव कदम, बजाजी नारायण कदम, विश्‍वास बाबाजी कदम, दीपक दिनकर कदम, संभाजी मुरारराव कदम, शिरीष पांडुरंग कदम व मानसिंग बाबूराव कदम अशा दहाजणांविरोधात चिपळूण पोलिसांनी सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

या संदर्भात राजेंद्र कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आपल्या भावाच्या लग्नानिमित्त 10 मे 2009 रोजी भावकीची बैठक बोलविली होती. यावेळी धोंडजीराव कदम व दत्ताराम कदम यांना वाळीत टाकलेले आहे. त्यांना बैठकीला का बोलावलेस, असे सांगून वाडीतील ग्रामस्थ या बैठकीतून निघून गेले. शिवाय आपल्या भावाच्या लग्नाला ते उपस्थित राहिले नाहीत. तसेच अन्य लोकांनाही उपस्थित राहू दिले नाही. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी साजरी होणारी होळी, शिमगोत्सव, तुळशी विवाह, गणेशोत्सव आदी धार्मिक कार्यक्रमांना हे लोक उपस्थित राहात नाहीत. ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन किंवा पालखीला खांदा लावू देत नाहीत. विरोध करून दमदाटी करतात. अशा प्रकारे आठ वर्षे आपल्यावर सामाजिक बहिष्कार टाकल्याची फिर्याद दाखल  करण्यात आली आहे.

या प्रकरणी दहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर करीत आहेत.