Thu, Jul 18, 2019 08:08होमपेज › Konkan › रत्नागिरीत ११ पासून ‘शिक्षणाची वारी’

रत्नागिरीत ११ पासून ‘शिक्षणाची वारी’

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 11:01PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रयोगांचे आदान-प्रदान व्हावे, कालानुरूप शिक्षण क्षेत्रात झालेले परिवर्तन समाज, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचावे व शिक्षण प्रक्रिया गतिमान व्हावी, या उद्देशाने जानेवारी महिन्यात ‘शिक्षणाची वारी’ हा उपक्रम  आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्यात शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून शिक्षण क्षेत्रात आगळे-वेगळे प्रयोग राबवण्यात येत आहेत, या प्रयोगाची फल निष्पत्ती सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचावी व एकूणच शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता वाढावी म्हणून गुणवत्ता विकासाच्या द‍ृष्टीकोनातून ‘शिक्षणाची वारी’ दि. 11, 12 व 13 जानेवारी या कालावधीत रत्नागिरी येथील एम. डी. नाईक हॉल उद्यमनगर-येथे आयोजित करण्यात आली आहे.

अध्ययन-अध्यापन पद्धतीत शिक्षक नवनवीन प्रयोग करत आहेत. शिक्षकांचे नाविन्यपूर्ण प्रयोग जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एका आगळ्या-वेगळ्या अनोख्या शिक्षणाच्या वारीचे प्रदर्शन गेली तीन वर्षापासून विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित केले जात आहे.

महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्यावतीने अमरावती, लातूर येथे वारीचे आयोजन करण्यात आले. आता रत्नागिरी जिल्ह्यात या वारीचे आयोजन करण्यात आले असून, रत्नागिरी जिल्ह्याचा शिक्षण विभाग यजमानपदाची भूमिका निभावत असल्याचे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, रत्नागिरी या संस्थेचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर ही वारी यशस्वी व्हावी म्हणून विशेष मेहनत घेत आहेत. 

या वारीच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर-रत्नागिरी, दुसर्‍या दिवशी सिंधुदुर्ग-रायगड, तिसर्‍या दिवशी सांगली-सातारा येथील शिक्षक भेट देणार आहेत. दर दिवशी 600 शिक्षक येणार आहेत.