Tue, Jul 16, 2019 11:39होमपेज › Konkan › शिक्षण हा जीवनाचा मूलभूत घटक : डॉ. सुहास पेडणेकर 

शिक्षण हा जीवनाचा मूलभूत घटक : डॉ. सुहास पेडणेकर 

Published On: Jun 04 2018 1:04AM | Last Updated: Jun 03 2018 10:14PMकासार्डे : वार्ताहर

विद्यार्थ्यांनी भविष्य घडविण्यासाठी शिक्षणाची कास धरली पाहिजे.  शिक्षण हा जीवनाचा मूलभूत घटक असून स्वतःची ओळख शिक्षणातूनच होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी ध्येयवादी राहणे गरजेचे असून चांगल्या लोकांचा आदर्श व चांगल्या गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे. बदल ही काळाची गरज असून या तंत्रज्ञानाच्या युगात यशस्वी होण्यासाठी ज्ञानाबरोबरच संवादकौशल्य, भाषेवर प्रभूत्व, व्यवस्थापन कौशल्य, सादरीकरण या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले. 

तळेरे येथील  विजयालक्ष्मी दळवी कॉलेज मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमात डॉ. पेडणेकर बोलत होते. ते  म्हणाले,  विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वासाने ध्येयाकडे झेप घेणे व यशस्वी होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वतःशी स्पर्धा करायला हवी. कोकणातील मुले मुळातच हुशार आहेत, पण तितकीच आत्मविश्‍वास कमी असलेली व लाजाळू आहेत, यासाठी येथील विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्‍वासपूर्वक पाऊल टाकण्याचे आवाहन डॉ. पेडणेकर यांनी केले. 

व्यासपीठावर महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य माहिती आयुक्त  डॉ. सुमित मलिक, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, डॉ. विनायक दळवी, समन्वयक डॉ. पांडुरंग पाटील, देणगीदार सत्यवान प्रभू व अन्य मान्यवर उपस्थित होते. 12 वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक वाटचालीकरिता एक दिवशीय विनामूल्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रा. विनायक दळवी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने विजयालक्ष्मी विश्‍वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे येथे जिल्ह्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालू करण्यात येत आहे. भविष्यात चझडउ, णझडउ, उएढ, इअछघखछॠ अशा विविध क्षेत्रातील मार्गदर्शन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या केंद्रामार्फत होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. 

स्वकौशल्याची पारख करा : डॉ. दिलीप पांढरपट्टे   

जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले, स्वतःमधील कौशल्याची पारख करून स्वतःचा शोध घेतल्यास विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतो. पालकांनी आपल्या मुलांना योग्य पद्धतीने प्रोत्साहित केल्यास मुले आवडीच्या विषयात निष्णात होऊ शकतात. यासाठी जिद्द, चिकाटी, परिश्रम गरजेचे आहे .

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटन, मत्स्यव्यवसाय, शेती अशा विविध माध्यमातून कौशल्यांचा वापर करून रोजगार निर्माण होत आहे.  या विद्यार्थ्यांचे विशेष परीक्षण करून अशा स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शन केल्यास जिल्ह्यात खअड अधिकारी निर्माण होऊ शकतात असे प्रतिपादन  माजी मुख्य सचिव  सुमित मलिक  यांनी केले.

कार्यक्रम प्रसंगी उपस्थित पत्रकार दत्तात्रय मारकड, निकेत पावसकर,  गुरुप्रसाद सावंत, अस्मिता गिडाळे यांचा सत्कार  कुलगुरू यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मंडळ अधिकारी केशव पोकळे आणि तलाठी दीपक पावसकर यांचाही  सत्कार करण्यात आला.  सत्यवान प्रभू यांनी महाविद्यालयाच्या वसतिगृहासाठी जमिनीच्या स्वरूपात दातृत्व करून मोलाचे सहकार्य केल्याबद्दल डॉ. सुमित मलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया जाधव यांनी केले. आभार  डॉ.पांडुरंग पाटील  यांनी  मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ  यांची उपस्थिती होती.