Sun, Jul 21, 2019 01:59होमपेज › Konkan › संगमनगर रस्त्यावरील अतिक्रमणात ‘अर्थकारण’

संगमनगर रस्त्यावरील अतिक्रमणात ‘अर्थकारण’

Published On: Aug 30 2018 1:19AM | Last Updated: Aug 29 2018 11:01PMखेड : अजय कदम

सातारा -कोरेगाव रस्त्यावरील  विसावा नाका, बाँम्बे रेस्टॉरंट चौक ते संगमनगर मार्गावरील अतिक्रमणधारकांना जिल्हा प्रशासनाने तीन, चार वेळा हुसकावून लावले.मात्र अतिक्रमणधारकांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. उलट येथील विक्रेत्यांनी बांधकाम विभागाने खर्च करून बांधलेला पदपथ बळकावला आहे. या परिसरातील अतिक्रमणांमध्ये मोठे अर्थकारण दडले असल्याचा आरोप होऊ लागला आहे. 

विसावा नाका-संगमनगर मार्गावर अतिक्रमणे बोकाळली आहेत.  कोणी स्थानिक फळकुटदादा  या ठिकाणी बांधकाम विभागातील अधिकार्‍यांच्या  आशीर्वादाने प्रोटेक्शन मनी गोळा करतो. त्यांच्या परवानगीशिवाय या ठिकाणी खोकचं काय पथारीही पसरता येत नाही, हे उघड गुपित असून येथील विक्रेत्यांकडून गोळा होणारे हप्ते कोणत्या अधिकार्‍यांना जातात? ही आर्थिक साखळी तोडून रस्त्यावर आलेल्या पादचार्‍यांसाठी पदपथ रिकामा करण्याचे धाडस जिल्हा प्रशासन दाखवणार का ? असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. 

सातारा-कोरेगाव रस्त्यावरील जिल्हा परिषद चौक, विसावा नाका, विसावा पार्क व पुढे बाँम्बे रेस्टॉरंट चोक ते संगमनगर या मार्गावझ रील दोन्ही बाजूंची अतिक्रमणे जिल्हा प्रशासनाने गेल्या दीड, दोन वर्षात तीन, चार वेळा हटविली. मात्र मोहीमेची पाठ वळताच विक्रेत्यांनी पुन्हा दुकाने थाटली.जि.प. चौकातून शासकीय विश्रामगृह, विसावा नाका परिसर,  विसावा कँम्प समोरील छ. शाहू अँकडमी रस्ता ते बाँम्बे रेस्टॉरंट पुढे कृष्णानगर, संगमनगर पर्यंत टपर्‍यांनी पदपथ काबीज केला. सुरूवातीला काहीनी छत केले.आता त्या ठिकाणी पककी खोकी टाकण्यात आली आहेत.बाँम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपूलाखाली तर दिवसेंदिवस टपर्‍यांमध्ये वाढ होत आहे. 

येथील बरोजगारीच्या नावाखाली टाकलेल्या टपर्‍यांमधून नक्की काय विकले जाते हा संशोधनाचा विषय असला तरी त्याकडे बांधकाम विभागाची होणारी डोळेझाक अर्थपूर्ण असल्याची जोरदार चर्चा नागरीकांमधून सुरु आहे. 

येथील चौकानजिक बांधकाम विभागाची जागा असून तेथे सद्या झोपड्यांचे मोठे अतिक्रमण आहे. या झोपड्यांना कोणाचा आशिर्वाद आहे? झोपड्यांमधून कोणती दुकानदारी सुरू आहे. याकडे बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन पहाणार का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रूपये खर्च करून येथील रस्त्यावर पदपथ बांधला व पेव्हर ही टाकले. आता त्याच पदपथावर विक्रेत्यांनी टपर्‍या टाकल्याने हे सुशोभीकरण व सुखसोयी अतिक्रमणधारकांसाठीच का ?  असा सवाल उपस्थित केला जात आहे. पदपथ बळकावले गेल्याने पादचारी नेहमीप्रमाणे रस्त्यावर आला आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा कोणी विचार करणार की नाही ? एखादा अपघात झाल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार का ?

हप्‍तेखोरांचे आव्हान पोलिस स्वीकारणार का?

विसावा नाका ते संगमनगर या परिसरातील अतिक्रमणांमध्ये मोठे अर्थकारण दडले असल्याची चर्चा असून अनेक अधिकारी, कर्मचार्‍यांचे हात ओले असल्याचे उघड गुपित आहे. संबंधितांच्या मुसक्या आवळून सुरक्षित वाहतूक व पादचार्‍यांसाठी हा रस्ता व परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचे धाडस कोणीही अधिकारी दाखवायला तयार नाहीत. सातार्‍यातून गुंडगिरी हद्दपार झाल्याचा दावा राजकीय व्यासपीठावरुन होतो. पण या परिसरातील हप्तेखोरांच्या कॉलरला हात घालण्याचे आणि त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे आव्हान पोलीस दलासमोर असून हे आव्हान जिल्हा व पोलिस प्रशासन स्वीकारणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.