Mon, Jan 21, 2019 19:47होमपेज › Konkan › ‘लीडर’ने फसविल्याचा ईडूच्या संचालकाचा आरोप

‘लीडर’ने फसविल्याचा ईडूच्या संचालकाचा आरोप

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 11:40PM

बुकमार्क करा
चिपळूण : खास प्रतिनिधी

गुगलवर जाहिराती बघून दामदुप्पट पैसे मिळवून देतो, असे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घालणार्‍या ठकसेनाला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर कसून चौकशी करीत आहेत. दरम्यान, आरोपी रवीकिरण बटुला याच्या कार्यालय व भाड्याच्या घराची झडती घेण्यात आली. या शिवाय त्याच्या नावावर असलेली 5 बँकांची खाती गोठविण्यात आली असून त्याच्याकडे गुंतवणूकदारांना परतावा देण्यास पैसेच नसल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे, तर आपल्याला ‘लीडर’नी फसविल्याचा आरोप त्याने पोलिस चौकशीत केला आहे.


चिपळुणात गेले वर्षभर ‘ईडू अ‍ॅन्ड अर्न कन्सल्टन्सी’च्या नावे दामदुप्पट पैसे देतो, असे आमिष दाखवून अनेकांकडून गुंतवणूक करून घेण्यात आली. मात्र, जाहिराती बघून सुरुवातीच्या टप्प्यात अनेकांना फायदा झाला. मात्र, गेल्या तीन महिन्यांमध्ये पैसे थकित राहू लागल्याने गुंतवणूकदार शहरातील बहादूरशेख येथील कार्यालयात गर्दी करू लागले. पैसे मिळावेत, यासाठी अनेकदा वादावादी झाली. यामध्ये रवीकिरण बटुला याने दोनवेळा गुंतवणूकदारांचा मारही खाल्ला. अखेर इम्तियाज मुकादम यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या कंपनीच्या तीसहून अधिक हार्ड डिस्क जप्‍त करून पोलिसांनी सील केल्या आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक फडणीस, पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर आदींच्या उपस्थितीत याचा पंचनामा करण्यात आला. दोन दिवसांत त्याच्या भाड्याच्या घराची झडती घेण्यात आली. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रोकड आढळून आली नाही. रवीकिरण हा अविवाहित असून त्याचा भाऊही कॉल सेंटरच्या व्यवसायात नुकसानीत गेलेला आहे. शिवाय या दोघांची आई आजारी आहे, असेही पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे मिळण्याची कोणतीच शक्यता नाही.

शिवाय बँक खात्यामध्ये पैसे नसून पोलिसांनी पाच खाती सील केली आहेत. त्यामुळे त्याने या स्कीममधून गोळा केलेला पैसा कुठे गुंतवला किंवा त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला याचा तपास पोलिस करीत आहेत. काही लीडरनी आपल्याला फसविल्याचा आरोप त्याने पोलिस चौकशीत केला आहे. यामुळे पोलिस या योजनेत गुंतलेल्या लीडरची चौकशी करणार आहेत. काही लोकांनी डबल परतावा घेतल्याचा आरोप रवीकिरण याचा आहे. पोलिसांकडे त्याची यादीसुद्धा देण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याची शक्यता आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांनी न घाबरता पोलिसांत तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक मिसर यांनी केले आहे.