Wed, Sep 19, 2018 18:12



होमपेज › Konkan › ‘ईडू’चा पुण्यातही कारभार

‘ईडू’चा पुण्यातही कारभार

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 10:43PM

बुकमार्क करा




चिपळूण : खास प्रतिनिधी

दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून चिपळूणवासीयांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणार्‍या ‘ईडू’च्या संचालकाला अटक झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहे. रविकिरण बटुला याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे चौकशीला वेग आला आहे. दरम्यान, याच कंपनीने पुण्यात हडपसर येथेही कारभार थाटल्याची माहिती मिळत असून चिपळुणातील एका राजकीय कार्यकर्त्याने आणखी एक तक्रार दाखल केली आहे.

‘ईडू’ने अनेकांना ‘येडू’ बनविल्याच्या नाक्यानाक्यांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. कोणी किती पैसे गुंतविले, कोणाला किती परतावा मिळाला, कोणाचे किती पैसे अडकले आणि कोणत्या लीडरने किती लोकांना या योजनेत गुंतविले याचे किस्से चर्चिले जात आहेत. त्यामुळे या ‘ईडू’ कंपनीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे पुढे येत आहे. रत्नागिरी येथील क्राईम ब्रँचच्या चौकशीत 23 कोटी 60 लाखांपर्यंत 
व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर चौकशी करीत आहेत. संचालक बटुला याला शुक्रवारी सकाळी त्याच्या कार्यालयात नेऊन चौकशी करण्यात आली. या ठिकाणी गेले वर्षभर पन्‍नास ते साठ मुली कॉम्प्युटर ऑपरेटर होत्या.

आता याच कंपनीच्या नावाने पुणे हडपसर या ठिकाणी कार्यालय उघडण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे चिपळूण पोलिसांनी येथील फसवणुकीबाबत पुणे पोलिसांना माहिती दिली आहे. चिपळुणातील गुंतवणुकदारांचे पैसे अडकल्याने हा खड्डा भरण्यासाठी पुण्यात नव्याने शाखा उघडण्यात आली. तेथे मिळणार्‍या पैशातून चिपळुणातील लोकांचे पैसे फेडले जाणार आहेत. मात्र, त्या ठिकाणी फसवणुकीचा धोका लक्षात घेऊन पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. 

दरम्यान, आता या प्रकरणी राजकीय कार्यकर्ता राकेश घोरपडे यांनी ‘ईडू’विरोधात शुक्रवारी सायंकाळी तक्रार दाखल केली आहे.  इम्तियाज मुकादम यांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला चालना मिळाली. आता दिवसेंदिवस फसवणूक झालेली नवनवीन प्रकरणे चर्चिली जात आहेत. याप्रकरणी चिपळूण पोलिस या स्कीममध्ये लोकांना गुंतविणार्‍या काही प्रमुख ‘लीडर’ची चौकशी करणार आहेत.