Sat, May 30, 2020 12:03होमपेज › Konkan › ई-लर्निंगला पर्याय नाही : आदित्य ठाकरे

ई-लर्निंगला पर्याय नाही : आदित्य ठाकरे

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 24 2017 1:44AM

बुकमार्क करा

चिपळूण : प्रतिनिधी

शाळेत मिळालेल्या गुणांपेक्षा तुम्ही काय शिकलात हे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी स्मार्ट एज्युकेशनवर भर द्यावा. बदलत्या तंत्रज्ञानामुळे  ‘ई- लर्निंग’ला पर्याय नाही, असे प्रतिपादन  शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले. ते विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

बहादूरशेखनाका येथील पुष्कर कॉम्प्लेक्समध्ये युवा नेते आदित्य ठाकरे यांनी न्यू इंग्लिश स्कूल सती चिंचघरी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दहावी  -बारावीतील विद्यार्थी परीक्षेदरम्यान तणावाखाली असतात. अधिकाधिक गुण मिळण्याचे दडपण त्यांच्यावर असते. नवीन तंत्रज्ञानामुळे आपण हा ताण, दडपण दूर करू शकतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्मार्ट एज्युकेशनवर भर द्यावा. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिवसेना ई-लर्निंग उपक्रम राबवीत आहे. टॅबद्वारे   विद्यार्थ्यांना सहज  शिकता येते. 

स्मार्ट एज्युकेशनमध्ये आत्मपरीक्षण

स्मार्ट एज्युकेशनमध्ये आत्मपरिक्षण, मूल्यमापन आदी सुविधा आहेत. मैदानी खेळांसह सर्वांगीण विकास आणि व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्यांनी साधला पाहिजे, असे आवाहन  आदित्य ठाकरे यांनी केले. 
दरम्यान, या दौर्‍यासाठी शनिवारी सकाळी आदित्य ठाकरे  हे चिपळूण रेल्वे स्थानकात आल्यावर शिवसेना पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. रेल्वे स्थानक ते बहादूरशेखनाका अशी दुचाकी रॅली काढण्यात आली.

या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, युवा तालुका अधिकारी उमेश खताते, यांच्यासह सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना देणार टॅब

शिवसेनेने तयार केलेल्या शैक्षणिक टॅबमध्ये शालेय अभ्यासक्रमाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी ई-लर्निंगवर अधिक भर द्यावा यासाठी लवकरच विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण केले जाईल, असे  असे आश्‍वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.