Thu, Sep 20, 2018 19:58



होमपेज › Konkan › ‘ई-ग्रामसॉफ्ट’ने ग्रामपंचायती होणार ऑनलाईन!

‘ई-ग्रामसॉफ्ट’ने ग्रामपंचायती होणार ऑनलाईन!

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 22 2018 10:37PM



रत्नागिरी : प्रतिनिधी

ग्रामीण भागात शासनाच्या सुविधा जलद गतीने देण्यासाठी आणि ग्रामपंचायतींचा कारभार ‘ई-ऑफिस’मध्ये परिवर्तीत करण्यासाठी ‘आपले सरकार’ योजनेतील ‘ई-ग्रामसॉफ्ट’  संगणक प्रणालीने ऑनलाईन होणार आहे. यासंदर्भात अलीकडेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे ग्रामसेवकांसाठी एका प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पंचायतराज संस्थांच्या कारभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांतर्गत असलेले सर्व कामकाज संगणकीकृत करून एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक सेवा दाखले, तसेच इतर व्यावसायिक, बँकिंग सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावरून त्यांच्या रहिवासी क्षेत्रातच मिळाव्यात, या हेतूने पंचायतराज संस्थांमध्ये ‘आपले सरकार’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. आता या व्यवस्थापनाचा कारभार 100 टक्के ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यानुसार आपले सरकारच्या सेवा केंद्रातील ई-ग्रामसॉफ्टद्वारे ग्रामपंचायतीचे 1 ते 33 नमुने संगणकाद्वारे मिळणार आहेत.

ग्रामस्थांना देण्यात येणारे 1 ते 19 सेवांचे दाखले या संगणक प्रणालीद्वारे देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांकडून 20 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ज्या केंद्रावर इंटरनेट जोडणी आहे, तिथे ऑनलाईन, तर जिथे नाही तिथे ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ग्रामसेवकांना प्रशिक्षण 

ग्रामसेवकांना प्रशासकीय स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने ग्रापंचायतीचे अंदाजपत्रक, वार्षिक जमा-खर्च, वार्षिक कर मागणी व वसुली यादी, कामाचे देयक, मोजमाप वही, ग्रामपंचायत लेखापरीक्षण पूर्तता वही, स्थावर मालमत्ता माहिती, रस्त्यांची माहिती, जमिनींचे नोंदपुस्तक, कर्मचारी पगारपत्रक, कामाचे अंदाजपत्रक नोंदवही, वार्षिक करपावतीची कामे आता ऑनलाईन होणार आहेत.