Wed, Jun 26, 2019 11:41होमपेज › Konkan › आयपीएल क्रिकेटचे गणित मला कळलेच नाही!

आयपीएल क्रिकेटचे गणित मला कळलेच नाही!

Published On: Mar 05 2018 10:40PM | Last Updated: Mar 05 2018 10:29PMमालवण : प्रतिनिधी

भारतीय क्रिकेट हे 1983 च्या विश्वचषक विजयानंतर खर्‍या अर्थाने बदलले. मात्र आयपीएलचे गणित मला कधी कळले नाही. आज विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत चांगली कामगिरी करत आहेत. 2019 च्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया व इंग्लंडसह भारत एक प्रबळ दावेदार आहेत, असे मत सुप्रसिद्ध क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी व्यक्‍त केले.

द्वारकानाथ संझगिरी पर्यटनानिमित्त मालवणात आले असता त्यांनी सोमवारी सायंकाळी मालवण नागरपरिषदेला भेट दिली. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी त्यांचे स्वागत केले. नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी व क्रिकेटप्रेमी नागरिक यांच्यासमवेत संझगिरी यांच्या क्रिकेट सह विविध विषयांवर गप्पा टप्पा रंगल्या. मुख्याधिकारी रंजना गगे, नगरसेवक नितीन वाळके, आपा लुडबे, मंदार केणी, यतीन खोत, नगरसेविका ममता वराडकर, पूजा कारालकार, सुनीता जाधव, तृप्ती मयेकर, पूजा सरकारे, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, प्रमोद करलकर आदी उपस्थित होते.

संझगिरी यांनी क्रिकेटसह मालवणच्या पर्यटनावर आपली मते व्यक्‍त केली. ते म्हणाले, मला गाव नसल्याने कोकणविषयी मला विशेष आकर्षण आहे. पूर्वी बोट वाहतूक असतानाचे मालवण आपण पाहिले होते. आज पर्यटन शहर म्हणून मालवण नावारूपास आले आहे. कोकणची आमराई, येथील टुमदार घरे, गर्द झाडी, मालवणी माणूस व त्याचे बोलणे, येथील खाद्यसंस्कृती आपल्याला विशेष आवडते, अशा भावना संझगिरी यांनी व्यक्‍त केल्या.

1983 सालच्या क्रिकेट विश्वचषक विजयाचे आपण साक्षीदार आहोत. आपण जिंकलो यावर त्यावेळी कोणालाच विश्वास बसत नव्हता. त्या विजयानंतर भारतीय क्रिकेट खर्‍या अर्थाने बदलले. एक मजबूत संघ म्हणून जग भारताकडे पाहू लागले. कपिल देव, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी व आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अधिक मजबूत झाला असून येत्या 2019 च्या विश्वचषकाचा भारत हा एक प्रबळ दावेदार असल्याचा दावा त्यांनी केला.आज भारताच्या मुख्य संघात तसेच 19 वर्षांखालील संघातील युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत.

मात्र त्यांना पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. मिळालेल्या संधीचा खेळाडूंनी फायदा करून घेतला पाहिजे. कारण क्रिकेट व राजकारणात दारे कधी बंद होत नाहीत. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा खेळ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. मात्र धोनी अनुभवी असून 2019 च्या वर्ल्डकपपर्यंत धोनीच्या जागी दर्जेदार खेळाडू न मिळाल्यास धोनीचे वर्ल्डकपच्या संघातील स्थान कायम राहील असेही संझगिरी म्हणाले.