Mon, Aug 19, 2019 09:05होमपेज › Konkan › उन्हाळी शेतीतून दुबार शेतीचा मंत्र!

उन्हाळी शेतीतून दुबार शेतीचा मंत्र!

Published On: Jan 06 2018 1:24AM | Last Updated: Jan 05 2018 10:49PM

बुकमार्क करा
दापोली : प्रवीण शिंदे 

कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये दुबार शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, पश्‍चिम रत्नागिरीमध्ये सहसा दुबार शेती केली जात नाही. मात्र, दापोली तालुक्यातील कोंढे गावातील भागोजी पाटील यांनी आपल्या घर परिसरातील शेतीमध्ये दुबार शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. यातून त्यांनी नाचणीची शेती केली आहे. ही नाचणीची शेती पावसाळ्यापेक्षा उत्तम प्रकारे जोम धरत असून फावळ्या वेळात पाटील यांनी ही नाचणीची शेती पिकवून दापोली तालुक्यातील शेतकर्‍यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

नाचणीच्या जोडीला वरीची देखील शेती केली आहे. यासाठी पाटील यांनी स्वतंत्र बोअरवेल मारुन तिचे पाणी या शेतीसाठी वापरत आहे. या नाचणीच्या शेतीबरोबर मुळा, वांगी, भोपळा, टोमॅटो, चवळी, मिरची, माठ, कोथिंंबीर, राई, मेथी, पावटा, कुळीथ, भेंडी, मका, पालक असा भाजीपाळ्याचा मळा आणि नारळ आणि सुपारी, अननसाचीही लागवड केली आहे.

पाटील यांच्या शेतमळ्यातील भाजीला कोंढे गावामध्ये मोठी मागणी असून लघुउद्योग म्हणून बचत गटांनी आदर्श घ्यावा, असा पायंडा कोंढे गावामध्ये त्यांनी उन्हाळी शेती आणि भाजीपाला यातून रचून ठेवला आहे.
दापोलीच्या मातीमध्ये उन्हाळी शेती आणि भाजीपाल्याची पिकेदेखील उत्तम प्रकारे होतात. हे यातून दाखवून दिले आहे. पावसाळी शेतीनंतर अनेकजण आपल्या भातशेतीमध्ये कलिंगड, तूर आणि पावटा ही हंगामी पिके तालुक्यामध्ये अनेकजण घेतात. यातूनदेखील शेतकर्‍यांना मोठा फायदा होता. मात्र, या हंगामी पिकांबरोबर भाजीपाला आणि नाचणीसारखी पिकेदेखील घेता येतात, हे पाटील यांनी लागवड केलेल्या नाचणीच्या पिकावरुन दिसून येते.

दापोली तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वाहत्या नद्या आहेत तर काही ठिकाणी स्वतंत्र विहिरीदेखील आहेत. मात्र, हंगामी शेती ही पारंपरिक शेती सोडली तर शेतकरी भाजी -पाल्यासारखी रोजच्या उदरनिर्वाहाची पिके घेत नाहीत. पाटील यांनी आपल्या परसदारामध्ये फुलवलेल्या विविध प्रकारच्या भाज्या आणि नाचणीची शेती पाहण्यासाठी परिसरातील अनेक लोक कुतूहलाने येत आहेत. या भाजीपाला व्यवसायाबरोबर शेळीपालन हा जोडव्यवसायही पाटील यांनी सांभाळला असून यातून त्यांना वर्षाकाठी चांगले उत्पन्‍न मिळत आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी पाटील यांच्या उन्हाळी शेतीचा आदर्श समोर ठेवून रोजच्या वापरासाठीचा भाजापाला पिकवून या गरजा शेतकर्‍यांना आपल्याच शेतातून भागवता येतील, असे उदहारण पाटील यांनी घालून दिले असून दुबार शेतीला पूर वातावरणात होत नाहीत, या समजाला त्यांनी छेद दिला आहे.