Mon, Jan 27, 2020 10:44होमपेज › Konkan › नापणे धबधब्यावर मूलभूत सुविधा मिळणार!

नापणे धबधब्यावर मूलभूत सुविधा मिळणार!

Published On: Feb 02 2019 1:29AM | Last Updated: Feb 01 2019 9:51PM
वैभववाडी : मारुती कांबळे 

पर्यटन विकासामधून सुप्रसिद्ध नापणे धबधब्यावर मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 56 लाख 27 हजार रुपयांचे अंदापत्रक जिल्हा नियोजनला सादर करण्यात आले आहे.त्यामुळे नापणे धबधब्यावर काही प्रमाणात मूलभूत सुविधा मिळणार आहेत.

तालुक्यातील बारमाही वाहणारा नापणे धबधबा हा प्रसिद्ध धबधबा आहे.दोन्हीही बाजूने हिरवीगार झाडी, त्यात ओसांडून वाहणारा धबधबा आहे.पावसाळ्यात उग्र रुप धारण केलेला ओसंडून वाहणारा धबधबा वर्षभर प्रवाहित असतो.येथे अनेक पर्यटक वर्षभर भेटी देतात.मात्र, येथे मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे येणार्‍या पर्यटकांची गैरसोय होत आहे.पालकमंत्री दीपक केसरकर,पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दोन वर्षांपूर्वी भेट दिली होती.यावेळी धबधब्याचा पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचे आश्‍वासन दिले होते. यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या धबधब्यावर मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी  56 लाख 27 हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करुन जिल्हा नियोजनला सादर केले आहे. यामध्ये दोन सेल्फी पाईंट, दोन्हीही बाजूने खाली उतरण्याची पायर्‍या बांधणे ही कामे प्रस्तावित केली आहेत. त्यामुळे थोड्या फार सुविधा होणार आहेत.मात्र, चेंजिंग रुम, बाथरुमसाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे अडचण येत असल्याचे  सा.बां.कडून सांगण्यात आले.

धबधब्यावर या हव्यात सुविधा

कोल्हापूर-तळेरे राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी धबधबा दर्शविणारे दर्शनी फलक आवश्यक आहेत. तसेच रेल्वेने येणार्‍या पर्यटकांसाठी वैभववाडी स्टेशनवर दर्शनी फलक लावणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणारा पर्यटकांना धबधब्याकडे जाणे सोपे होईल.पर्यटकांना धबधबा व धबधबा परिसराचे निरीक्षण करण्यासाठी ‘वॉच टॉवर’ उभारणे गरजेचे आहे. धबधबध्याकडे जाण्यासाठी अंतर्गत रस्ता नूतनीकरण करणे आवश्यक आहे.