Wed, Apr 24, 2019 15:28होमपेज › Konkan › विठुरायाच्या दर्शनाला भक्‍तांची मांदियाळी

विठुरायाच्या दर्शनाला भक्‍तांची मांदियाळी

Published On: Jul 23 2018 11:13PM | Last Updated: Jul 23 2018 10:56PMरत्नागिरी : प्रतिनिधी

आध्यात्मिक, ऐतिहासिक याबरोबरच प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी शहरातील प्राचीन विठ्ठल मंदिरामध्ये सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या भक्‍तांचा दर्शनासाठी जनसागर लोटला होता. हजारो भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पहाटे श्रींच्या मूर्तीला विठ्ठल मंदिर मित्रमंडळातर्फे दुग्धाभिषेक करण्यात आला. काकड आरती नंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांनी या वर्षी अलोट गर्दी केली होती. तसेच एकादशीनिमित्त परिसरात परंपरागतरित्या भरत आलेल्या जत्रेत यंदाही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रत्नागिरीत अतिशय भक्‍तीभावात, उत्साहात एकादशी उत्सव साजरा झाला.

आषाढी एकादशीनिमित्त मंदिरातील वातावरण टाळ-मृदुगांच्या, विठ्ठल रखुमाईच्या नाम गजराने भक्‍तीपूर्ण होऊन गेले होते. श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींना अलंकारांनी सजवण्यात आले. पहाटे विधिवत शोडषोपचार पूजा अर्चा झाल्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले होते. मंदिराच्या सभामंडपात अनेक मंडळांनी दिवसभर भजन सादर करून विठ्ठल चरणी सेवा अर्पण केली. अभिषेक, महापूजा, कीर्तन, सत्संग, भजन, प्रसाद, अशा विविध धार्मिक कार्यांनी मंगलमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. याचबरोबर कुवारबांव येथील विठ्ठल मंदिरातही कार्तिकी एकादशी भक्‍तीभावात साजरी करण्यात आली.

भाजयुमो’तर्फे खिचडी वाटप

प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा रत्नागिरी शहर यांच्यावतीने मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्‍तांना तुळशी रोप आणि खिचडीचे वाटप करण्यात आले. तुळशी रोप तसेच खिचडी वाटपाचा कार्यक्रमाला भक्‍तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते.