Wed, Apr 24, 2019 07:30होमपेज › Konkan › जगबुडी पूल खचल्याने वाहतूक थांबवली

जगबुडी पूल खचल्याने वाहतूक थांबवली

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 10:52PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील भोस्ते मार्गावर जगबुडी नदी येथे असलेला पूल दि.12 रोजी सकाळी खचलेला असल्याचे दिसून आले. पुलाच्या खेड शहराकडील बाजूचा जोड रस्ता व पूल यामध्ये पाच ते सहा इंचाची भेग पडली असून वाहतुकीसाठी धोका निर्माण झाला. ग्रामस्थांनी ही बाब जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या व पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी पुलावरून होणारी अवजड वाहतूक थांबवली आहे.

या घटनेची माहिती मिळताच दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय कदम यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळाला भेट दिली व अधिकार्‍यांना पुलाची डागडुजी करण्याच्या सूचना केल्या. खेड शहर व भोस्ते गावांमध्ये जगबुडी नदीवर अनेक वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला आहे. या पुलाची दुरवस्था झाली असून काही महिन्यांपूर्वी पूल अवजड वाहतुकीस धोकादायक बनला असल्याची तक्रार काँग्रेसचे गौस खतिब व कार्यकर्त्यांनी केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला धोक्याची सूचना देणारे फलक लावले होते. परंतु या फलकांकडे अवजड वाहन चालकांनी दुर्लक्ष करून वाहतूक सुरूच ठेवली होती. सोमवार दि. 12 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुलाच्या खेड शहराकडील बाजूस जोड रस्ता व पूल यामध्ये 5 ते 6 इंच रूंदीची भेग पडलेली रिक्षाचालकांना आढळली. 

जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता खेडेकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पुलाची पाहणी केली. यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कदम,  जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय बिरवटकर, काँग्रेसचे गौस खतीब यांनी देखील अधिकार्‍यांना या घटनेनंतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

खेड शहरातून मुंबई-गोवा महामार्गाकडे जाण्यासाठी हा पर्यायी मार्ग आहे. या पुलामुळे खेड शहर व भोस्ते, अलसुरे, निळीक, कोंडीवली,  शिव आधी गावे जोडण्यात आली आहेत. या पुलावरून रहदारी वाढली आहे. त्यामुळे दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने मोठ्या संख्येने दररोज ये-जा करत असतात. सातत्याने मागणी करूनही पुलाची डागडुजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेली नाही. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. या पुलावरून खडी, वाळू यांची वाहतूक करणारी अवजड वाहने मोठ्या संख्येने जात असल्याने पुलाला भेगा पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महसूल विभागाने या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने महत्त्वाचा असलेला पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचे ग्रामस्थांनी अधिकार्‍यांना सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता खेडेकर यांनी पुलावरून अवजड वाहने जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल, असे आश्‍वासन दिले. या पुलाची तत्काळ डागडुजी करून पूल वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.