Wed, Jan 16, 2019 17:39होमपेज › Konkan › गणेशोत्सवामुळे जिल्ह्यात बंद नाही!

गणेशोत्सवामुळे जिल्ह्यात बंद नाही!

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 10:44PMकणकवली : प्रतिनिधी

पेट्रोल, डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे गगनाला भिडणारी महागाई, परिणामी सर्वसामान्यांचे असह्य झालेले जगणे या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसने पुकारलेल्या देश बंदच्या पार्श्‍वभूमीवर  सिंधुदुर्गात काँग्रेससह राष्ट्रवादी आणि मनसेने या बंदला पाठिंबा देत तहसीलदार आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन महागाईचा निषेध केला. मात्र, गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने गणेशभक्‍तांची गैरसोय होऊ नये यासाठी सिंधुदुर्गात बंद पाळण्यात आला नाही. 

पेट्रोलचा वाढता दर व वाढती महागाई याचा निषेध नोंदविण्यासाठी व केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला होता. राज्यात ठिकठिकाणी या बंदला कमी-अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्गात मात्र सध्या गणपती उत्सवाची मोठी धामधूम सुरू आहे. चाकरमानी मंडळीही मोठ्या संख्येने दाखल झाली आहेत. त्यामुळे गणेशभक्‍तांच्या या आनंदावर विरजण पडू नये यासाठी सोमवारी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला नाही. मात्र या बंदला पाठिंबा देत तहसीलदार आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन महागाईचा निषेध करण्यात आला.