Fri, May 24, 2019 21:23होमपेज › Konkan › चिपळुणातील धनगरवाड्यांची भागणार तहान

चिपळुणातील धनगरवाड्यांची भागणार तहान

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 10:27PMचिपळूण : शहर वार्ताहर

पंचायत समिती सभापती पूजा निकम यांच्या प्रयत्नाने जयगड पॉवर ट्रान्स्को लि. कंपनीच्या (जिंदल) माध्यमातून अडरे, अनारी, कोंडमळा, सावर्डे, टेरव या पाच गावांतील धनगरवाड्यांचा पाण्याचा प्रश्‍न मिटणार असून त्यांच्यासाठी पाण्याची साठवण टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीची पाहणी तहसीलदार जीवन देसाई, गटविकास अधिकारी सरिता पवार, पूजा निकम व ग्रामस्थांनी केलीपूजा निकम यांच्या माध्यमातून कोंडमळा, सावर्डे धनगरवाडीत अनेक वर्षे खासगी स्वरूपात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. येथील ग्रामस्थांची पिण्यापेक्षा जनावरांना पाण द्या, अशी मागणी होती. दरवर्षी उन्हाळ्यात हे ग्रामस्थ पाण्यासाठी स्थलांतर करीत होते. ही समस्या लक्षात घेऊन निकम यांनी हा प्रश्‍न निकाली काढण्याचे ठरविले.

तत्कालीन तहसीलदार वृषाली पाटील व सध्याचे तहसीलदार जीवन देसाई यांनी हा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी सहकार्य केले. अखेर पाच गावांतील धनगरवाड्यांचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी जयगड पॉवर ट्रान्स्को कंपनीला साकडे घालण्यात आले. त्यांच्या माध्यमातून पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. आगामी वर्षात या पाच धनगरवाड्या टंचाईमुक्‍त होतील, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.
येथील ग्रामस्थांनी या कामाबद्दल निकम यांना धन्यवाद दिले. कोंडमळा धनगरवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, आंबा कलम व कापडी पिशव्यांचे वाटप, तसेच सावर्डे ग्रामपंचायत येथे वृक्षारोपण करण्यात आले.

चिपळूण शहरातील पागझरी येथील जिद्द गृहनिर्माण सोसायटीत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पंचायत समितीत प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी सरिता पवार, उपसभापती शरद शिगवण, पं. स. सदस्य बाबू साळवी, नंदकुमार शिर्के, दशरथ दाभोळकर आदी सदस्यांनी त्यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. अनेक वर्षे तहानलेल्या धनगरवाड्यांमध्ये पाण्याची सोय होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.