Sun, Mar 24, 2019 16:44होमपेज › Konkan › बाणकोटमध्ये ‘ड्रेझर’ची धडधड सुरूच

बाणकोटमध्ये ‘ड्रेझर’ची धडधड सुरूच

Published On: Jun 17 2018 10:27PM | Last Updated: Jun 17 2018 10:14PMमंडणगड : प्रतिनिधी

दहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर यंदाच्या हंगामात तालुक्यात संयुक्त रेती गट ड्रेझर्ससाठी खुले करण्यात आले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केल्यानुसार बाणकोट रेती बंदर परिसरातील रेती गटाची  लिलाव प्रक्रीया पूर्ण झाली. ड्रेझरचे वाळू उपशातील पर्यावरणहानीचे आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात पर्यावरण प्रेमींनी याचिका दखल केल्याने लिलावाला स्टे आला. उच्चन्यायालयाने हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केलेे. लवादाकडे या संदर्भातील ट्रायल सुरु असताना ड्रेझिंगवरील स्टे उठवण्यात आल्याने खाडीपात्रात ड्रेझर धडधड दिवस रात्र सुरु झाली आहे. 

या वाळू उपशाबाबत खाडी परिसरातील नागरिकांच्या तक्रारी मंडणगड तहसिल कार्यालयाकडे येऊ लागल्याने तहसिल कार्यालयाची भूमिका निर्णायक बनली आहे.  तक्रारींच्या अनुषंगाने नियम मोडून अनधिकृत वाळू उपसा सुरु असल्यास संबंधिताविरोधात कडक कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाने स्विकारणे गरजेचे आहे. संयुक्त रेती गटांशी चार तहसिल कार्यालयांचा संबंध येत असल्याने नेमकी कार्यवाही कोणी करावी?, याविषयी महसूल विभाग अनभीज्ञ आहे, अथवा महसूलकडून कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवले जात नसल्याने तक्रारादारांमध्ये नाराजी आहे.  
वाळू उत्खननासाठी पर्यावरण विभाग, मेरीटाईम बोर्ड व खनिकर्म विभागाने घालून दिलेल्या 
निर्देशांचे शंभर टक्के पालन होत आहे की नाही, याची दक्षता सर्व संबंधित खात्यांनी घेणे गरजेचे बनले आहे. सध्या सुरु असलेल्या ड्रेझिंगकरिता स्टँडबाय ड्रेझरची परवानगी नसतानाही खाडीपात्रात दोन जास्तीचे ड्रेझर वाळू उपसा करताना तक्रारदारांना दिसत आहे. त्यामुळे पाच ड्रेझरच्या माध्यमातून उपशाकरिता दिलेल्या निर्देशापेक्षा कितीतरी अधिक वाळूसाठा उपासा केल्या जात असल्याचा आक्षेप आहे. 

खाडीपात्रात ज्याठिकाणी गाळ आहे, त्याठिकाणी गाळ उपसा करण्यापेक्षा जेथे पूर्वी वाळू खणून खाडीपात्राची खोली 70 फुटापर्यंत खाली गेली आहे. त्याच ठिकाणी निव्वळ रेती उपसा करुन खोली वाढवण्याचे काम सुरु आहे. यातही उपसा करुन शिल्लक राहिलेला गाळ तिथेच परत टाकला जात आहे. बाणकोट वगळता अन्य गावातील खाडी पात्रात वाळू उपसा करण्याची आवश्यकता नसून खोलीच्या निर्देशाबाबत मेरीटाईम बोर्डाची फसवणूक केली जात आहे. वाळू उपसा करण्याकरिता ठरवून दिलेल्या निकषांना हरताळ फासून जेथे सहज वाळू मिळते, तेथे नियम मोडल्याने पर्यावरणाच्या र्‍हास होत आहे. मेरीटाईम बोर्डाने उपसा करणार्‍यांना पाण्यात चॅनलची आखणी करुन देण्याची मागणीही होत आहे. ड्रेझर मोठा आवाज ग्रीस डिझेल व ऑईलमुळे जलप्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. 

हे खाडीपात्र मगरी व डॉल्फीनचे सुरक्षीत आवासाकरिता प्रसिध्द आहे. याशिवाय येथील वाल्मिकीनगर, शिपोळे, वेसवी येथे मोठ्या प्रमाणावर मच्छिमारीही केली जाते. या आक्षेपांमुळे ड्रेझींग करताना सर्व नियमांचे पालन होत आहे अथवा नाही, याशिवाय जास्तीचा वाळू उपसा करुन शासनाचा महसूल तर बुडविला जात नाही ना, याची खातरजमा करण्याचे गरज आहे. ही जबाबदारी महसूल विभागावर आल्याने ड्रेझिंगशी संबंधीत मंडणगड, श्रीवर्धन, महाड, म्हसळा, तालुक्यातील तहसिल कार्यालयांनी तक्रारीची दखल घेऊन धडक कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.