Sun, Dec 15, 2019 03:25होमपेज › Konkan › महामार्ग चौपदरीकरणामुळे दुभंगली गावे!

महामार्ग चौपदरीकरणामुळे दुभंगली गावे!

Published On: Jun 10 2019 1:34AM | Last Updated: Jun 09 2019 11:09PM
नांदगाव : वार्ताहर 

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणांतर्गत तळगाव ते कलमठ या टप्प्यात कासार्डे व असलदे भागात नागरिकांना येजा करण्यासाठी सर्व्हिस  रोड नसल्याने तसेच महामार्गावरील दोन लेनच्या दुभाजकाला कट नसल्याने व पायवाटा बंद झाल्याने येथील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. या भागात एस.टी.बस थांबे ही उभारण्यात न आल्याने  प्रवासी व स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे.   हायवे प्राधिकरणच्या या नियोजनशून्य कारभाराबाबत नागरिकांमधून  तीव्र  नाराजी व्यक्‍त होत आहे. तर स्थानिक लोकप्रतिनिधीही याबाबत उदासीन आहेत. याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करत असताना कोणत्या ठिकाणी काय होणार,रस्त्याचा मार्ग कसा असणार, वाहनतळ, स्वच्छता गृह, एस.टी प्रवासी थांबे याबाबत काहीही माहिती देण्यात स्थानिकांना दिलेली नाही.यामुळे सध्या कासार्डे तिठ्ठा, जांभूळवाडी, ब्राम्हणवाडी, सरवणकरवाडी, असलदे-तावडेवाडी येथील नागरिकांना रस्ता ओलांडताना व वाहने अलिकडे व पलीकडे जाण्यासाठी मार्ग बंद झाल्याने गैरसोय निर्माण झाली आहे.येथील नागरिकांचा संपर्कच तुटला आहे.  परिणामी नागरिकांना ज्या ठिकाणी पर्यायी मार्ग आहे, अशा ठिकाणी जावून पुन्हा मागे फिरून यावे लागणार आहे. याचा फटका रुग्णाला व नातेवाईकांना बसणार आहे. 

या भागात सर्व्हिस रोड नसल्याने प्रवासी व नागरिकांना नव्या सिमेंट मार्ग व एक दोन किलोमीटर अंतरावर जावून परत यावे लागत आहे. कासार्डे-जांभूळवाडी येथे शंभरहून अधिक कुटुंबाची रस्त्याच्या दुतर्फा घरे असल्याने दोन्ही बाजूच्या रहिवाशांची गैरसोय होत आहे. ब्राम्हणवाडी, सरवणकरवाडी व असलदे -तावडेवाडी येथेही हीच परिस्थिती आहे. इतर ठिकाणी बसस्टॉप उभारणी केली असताना या ठिकाणी अजूनही बसस्टॉचची एक वीटही रचलेली नाही.यामुळे  येत्या पावसाळ्यात प्रवाशांनी कुठे उभे राहयचे हा प्रश्‍न आहे.

याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून कोणतेही अपेक्षित उत्तर मिळालेले नाही.  हायवे प्राधिकरणच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली असता दिल्लीवरून वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक असून ती परवानगी जो पर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्‍न सुटणार नसल्याचे सांगितले. तसेच काही ठिकाणी बॉक्सवेल व ओव्हरब्रीज झाल्याने याबाबत नियमानुसार मार्ग देता येत नाही, असेही सांगण्यात आले आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून ही समस्या सोडविण्याची गरज आहे.महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले. मात्र, याबाबत हायवे प्राधिकरण अधिकारी व ठेकेदार कंपनीने नागरिकांना माहिती न दिल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.