Sun, Apr 21, 2019 03:57होमपेज › Konkan › प्रकल्पांबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी?

प्रकल्पांबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी?

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 8:08PMराजापूर : प्रतिनिधी

नाणारचा रिफायनरी व जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प हे दोन्ही पर्यावरणाला घातक आहे. काँग्रेसने सध्या रिफायनरीला विरोध सुरू केला आहे. विरोध करणार्‍या स्थानिक जनतेच्या लढ्याला काँग्रेसने भक्‍कम साथ दिली आहे. एकीकडे रिफायनरीला विरोध असताना दुसरीकडे जैतापूरची मात्र पाठराखण का करण्यात आली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. काँग्रेसची ही भूमिका म्हणजे ‘रिफायनरी हटाव व अणुऊर्जा बचाव’ अशी का? याबाबत उलटसुलट चर्चा राजापूर परिसरात सुरू आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी काँग्रेसच्या सत्ताकाळात देशातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प तालुक्यातील जैतापूर परिसरात आला. त्याला सुरूवातीपासूनच जोरदार विरोध होऊ  लागला होता. त्या प्रकल्पातून बाहेर पडणार्‍या किरणोत्सारामुळे मानवी जीवनासह परिसरातील बागायती, भातशेती, मच्छीमारी यांना मोठा धोका होईल. या कारणासाठी स्थानिक जनता विरोधात उभी ठाकली असतानाच तत्कालीन काँग्रेस सरकारने अणुऊर्जा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अनेक आंदोलने झाली होती. एका आंदोलनादरम्यान तबरेज सायेकर या आंदोलकाचा पोलिसांची गोळी लागून मृत्यू झाला होता.

त्यानंतर केंद्रात सत्तांतर झाले व सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात जगातील सर्वात मोठा असा रिफायनरी प्रकल्प आणला. हा प्रकल्पदेखील पर्यावरणाला धोकादायक असल्याच्या कारणावरून स्थानिक पातळीवरून विरोध होऊ लागला आहे. यामध्ये भाजप वगळता उर्वरित सर्वच पक्षांनी रिफायनरी प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, रिफायनरी प्रकल्पाविरूद्ध लढणार्‍या स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेऊन काँग्रेसने देखील त्यांना पाठिंबा दिला आहे. शासनाकडून रिफायनरी प्रकल्प लादण्याच्या भूमिकेला विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ नाणार परिसरात येऊन गेले होते. राजापुरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा याबाबत विचारण्यात आले, त्यावेळी संबंधितांनी सारवासारव केली. वास्तविक  रिफायनरीसह जैतापूरचा अणुऊर्जा हे दोन्ही प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असतानाच काँग्रेसने नाणारच्या विरोधाला पाठिंबा दिला पण जैतापूरबाबत एकही शब्द न काढल्याने काँग्रेसच्या भूमिकेबाबत आता शंका घेतली जात आहे.

 जैतापूरग्रस्तांची भेट टाळली...

जैतापूरचा प्रकल्प काँग्रेसच्या सत्ताकाळात आला होता. त्यावेळी प्रकल्प रेटण्यासाठी कशा पद्धतीचे प्रयत्न झाले ते सर्वश्रुत आहेत. जैतापूर प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली तर तेथील प्रकल्पग्रस्तांच्या रोषाला काँग्रेसला सामोरे जावे लागले असते. शिवाय रिफायनरी विरोधातील आंदोलनावरही परिणाम होईल. याची भीती काँग्रेसला असावी म्हणूनच त्यांनी जैतापूर प्रकल्पग्रस्तांना अद्याप भेट दिलेली नाही.

Tags : Konkan, Double, role, Congress, project