Sat, Jul 20, 2019 08:37होमपेज › Konkan › डबल डेकर झाली आठ डब्यांची!

डबल डेकर झाली आठ डब्यांची!

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 10:51PMरत्नागिरी : खास प्रतिनिधी

कोकण रेल्वे मार्गावरुन धावणारी वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेस आता आठच डब्यांसह धावणार आहे. या निर्णयाची कार्यवाही बुधवारपासून झाली असून ही गाडी पूर्वीच्या 10 ऐवजी 8 डब्यांची झाली आहे.

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून वातानुकूलित डबल डेकर गाडी (11085/11086) सुरु आहे.   काही दिवसांपूर्वीच या गाडीला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे कारण पुढे करुन ती बंद करण्याची तयारीदेखील करण्यात आली होती. मात्र, रेल्वेकडून आखल्या गेलेल्या गैरसोईच्या वेळापत्रकामुळेच या गाडीला प्रवाशांचा अपेक्षित प्र्रतिसाद मिळत असल्याची ओरड झाल्यानंतर रेल्वेने ही गाडी बंद करण्याचा निर्णय झाला नसल्याचा निर्वाळा देत डबल डेकरचे दि. 15 फेब्रुवारीपासून पुढील सर्व दिवसांसाठी बंद केलेले आरक्षण पुन्हा सुरु केले. त्यामुळे कोकण तसेच गोवावासीयांसाठी सुरु करण्यात आलेली ही दुमजली वातानुकूलित गाडी कोकण रेल्वे मार्गावर कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याचे  रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या गाडीवरील संकट तूर्त तरी टळले आहे. 

दरम्यान, ही गाडी कायमस्वरुपी प्रतिसादासह सुरु रहावी, यासाठी  मध्य रेल्वेकडून या गाडीची वेळ बदलण्यासह तिचे रुपांतर ‘ओव्हरनाईट डबल डेकर’मध्ये करण्याच्या हालचालीही सुरु असल्याचे समजते.