होमपेज › Konkan › मुलीच्या लग्नासाठी मिळालेल्या  3 लाखांची अनाथालयाला देणगी

मुलीच्या लग्नासाठी मिळालेल्या  3 लाखांची अनाथालयाला देणगी

Published On: Jul 31 2018 10:34PM | Last Updated: Jul 31 2018 10:26PMदेवरुख  : प्रतिनिधी

देवरुख मातृमंदिर संस्थेचे कार्यवाह आत्माराम मेस्त्री यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी मिळालेले 3 लाख 7 हजार रुपये गोकुळ अनाथालयाला देणगी म्हणून दिले. या दातृत्वाबद्दल आत्माराम मेस्त्रींच्या उदारतेचा गौरव करण्यात आला.

प्रा. आत्माराम मेस्त्री हे  सेवानिवृत्त झाले. एकुलत्या एका मुलीचं लग्न गत दि.2 मे रोजी थाटामाटात झालं. पेन्शन मिळत नाही तरीही कर्ज काढून व पीएफच्या रकमेतून हे लग्न केलं. विविध संघटना,संस्था,सहकारी मित्र यांनी सरांना न सांगता  3,07,551 रूपयांची मदत केली. सरांनी ही मदत लग्नानंतर पंधरा दिवसांनी सर्व रकमेचा चेक काढून मातृमंदिर देवरूखच्या गोकुळ या अनाथलयाच्या नावे दिला, ही बाब आदर्शवत्च आहे. अद्यापही पेन्शन न मिळालेले सर काटकसरीनं घर चालवून मुलीचं लग्न करतात. मदत मिळालेले पैसे दान करतात हे दातृत्व येते कोठून? हा प्रश्न पडतो.

प्रा.मेस्त्री यांनी इंग्रजीचे प्राध्यापक असताना लग्न मात्र देवरूखच्या अनाथलयातील मुलीशी केलं. सरांनी लग्न समारंभपूर्वक न करता रजिष्टर पद्धतीनं केलं केलं. सरांना मातृमंदिरचे वसतीगृहात पदवीचे शिक्षण घेत असताना संस्थेत समाजवाद्यांची फौजच येत असे. ना.ग.गोरे,एस. एम. जोशी, मधु दंडवते, ग.प्र.प्रधान, भाई वैद्य, यदुनाथ थत्ते, मृणाल गोरे, पुष्पा भावे, मेघा पाटकर,अनिल अवचट, बाबा आढाव या सर्वांच्या विचाराचा प्रभाव सरांवर पडला.    सरांच्या प्रती निष्ठा व्यक्‍त करून सरांच्या  कार्याचा गौरव म्हणून 21 जानेवारीला संघटना आणि माजी विद्यार्थ्यांनी मोठा सत्कार केला. सर,रत्नागिरी जिल्हा पतपेढीचे सलग पंधरा वर्षे सदस्य होते.दोन वेळा चेअरमन होते. टीडीएफ संघटनेचे राष्ट्रीय व राज्यस्तर सदस्य होते. राज्यभर काम केलं.पण कोणाकडूनही राज्यभर फिरताना प्रवासखर्च घेतला नाही.  आजही  सर राष्ट्रसेवादल,अंधश्रद्धा निर्मुलन,सानेगुरूजी व्याख्यानमाला यामध्ये सहभागी होतात. चळवळी करत असताना प्रचंड त्रास सोसला, खूप नुकसान झाले,अद्यापही पेन्शन नाही.तरीही सर डगमगले नाहीत. आपल्या दातृत्वाचा एकएक नमुना दाखवतच राहिले. त्याच्या दातृत्वाला सर्वच स्तरातून सलाम ठोकण्यात येत आहे.