होमपेज › Konkan › उमेश शेट्ये; रत्नागिरीत लोकमान्य टिळक विद्यामंदिरात कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया

...हा तर लोकमान्यांचा अपमानच

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 10:50PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी नगर परिषदेच्या लोकमान्य टिळक विद्यामंदिर (शाळा क्र. 2) इमारतीच्या खोलीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. हा लो. टिळकांचा एकप्रकारे अपमान असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते उमेश शेट्ये यांनी केला. याबाबत तक्रार करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील नवीन भाजी मार्केटजवळच्या शाळा क्र. 2चे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले आहे. ऑडिटमध्ये ही इमारत वापरण्यास धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या दुसर्‍या शाळांमध्ये वर्ग करण्यात आले आहे. 

या शाळेच्या इमारतीच्या तळमाळ्यावरील रुम भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे, बेशुद्ध अवस्थेतील कुत्र्यांना दुसर्‍या रुममध्ये ठेवले जात असल्याचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांनी पत्रकारांना दाखवले.
शाळा इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील रुममध्ये स्वराज्य संस्थेकडून 10 वीच्या विद्यार्थ्यांचे क्‍लास घेतले जात असल्याचेही शेट्ये यांनी दाखविले. 

धोकादायक इमारतीमधून इतर विद्यार्थ्यांना दुसर्‍या शाळांमध्ये पाठविले. तेथेच इतरांना वापर करण्यास देऊन  ‘रनप’ अधिकारी पदाधिकारी काय साध्य करत आहेत, असा सवाल करुन ज्या शाळेत लोकमान्य शिकले तेथे कुत्र्यांची नसबंदी करणे हा त्यांचा अपमान असल्याचा आरोप उमेश शेट्ये यांनी केला.

लोकमान्यांना अपेक्षित असेच न. प.चे कार्य

लोकमान्य टिळक जनहितासाठी झटले. त्यांना अभिप्रेत असणारे कार्यच आमच्याकडून होत आहे. भटक्या कुत्र्यांचा शहरवासीयांना किती उपद्रव होतो, हे त्यांनाच माहित आहे. ही समस्या दूर व्हावी, यासाठी कोणाला जमली नाही ती निर्बीजिकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. हे काम 3 ते 4 महिन्यांचेच आहे. तेथे कायमस्वरुपी कोणाचेही बस्तान नाही. त्यामुळे लोकमान्यांच्या अनादराचा प्रश्‍नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी दिली.

रत्नागिरी नगर परिषदेची इमारतसुद्धा स्ट्रक्‍चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरली आहे. या इमारतीत राष्ट्रवादीचे नेते उमेश शेट्ये तासन्तास येऊन बसतात. आपली कामे करून घेतात.  त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य सभेसाठी येतात तेही याच धोकादायक इमारतीमधील सभागृहात तास, दोन तास येऊन बसतात. तेव्हा त्यांना कोणता विचार येतो हेही त्यांनी सांगितले पाहिजे. त्यामुळे शेट्येंचे राजकारण हे राष्ट्रपुरुषाच्या श्रद्धेपोटी नसून विरोधाला विरोध करण्याचे आहे, असेही नगराध्यक्षांनी सांगितले. आमचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक आहे, हे जनतेला माहित असल्याचेही ते म्हणाले.

शहरात गेल्या कित्येक वर्षांत भटक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या. ही समस्या सोडविण्यासाठी यापूर्वीच्या सत्तेतील कोणीही पुढाकार घेतला नाही. शिवसेनेची एकहाती सत्ता आल्यानंतर आम्ही ही समस्या सोडवित आहोत. पण विरोधक राष्ट्रपुरुषांच्या फसव्या आदरापोटी राजकारण करीत असल्याचेही नगराध्यक्ष म्हणाले. येथे क्लास सुरू असतील तर ते योग्य नसून त्यावर योग्य कार्यवाही करू, असेही नगराध्यक्षांनी सांगितले.

निर्बीजीकरणासाठी आवश्यक असणारी जागा याच शाळेत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर बेशुद्ध असणार्‍या कुत्र्यांना स्वतंत्र  खोलीमध्ये ठेवावे लागते. जेव्हा आणले जाते तेव्हाही  त्यांना सुरक्षितपणे ठेवावे लागते.