होमपेज › Konkan › दोडामार्ग नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत निश्‍चित

दोडामार्ग नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत निश्‍चित

Published On: May 18 2018 11:19PM | Last Updated: May 18 2018 10:32PMदोडामार्ग : प्रतिनिधी

कसई-दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनराध्यक्ष निवडणूक शनिवारी होत आहे. चार जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले होते. यातील शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सुषमा लवू मिरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून तिघेजण रिंगणात राहिले आहेत. यांत भाजपाच्या सौ. रेश्मा कोरगांवकर, राष्ट्रीय काँग्रेसच्या सौ. उपमा गावडे तर शिवसेनेच्या सौ. लिना कुबल यांचा समावेश आहे. दरम्यान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूकीत भाजपचे जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर अलिप्त असल्याचे दिसून येत आहे. 

सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची असलेली कसई-दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूक शनिवारी होत आहे. आपआपले नगरसेवक फुटू नयेत यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पाचही नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. तर राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे गट स्थापन केला असून गटनेता म्हणून विद्यमान नगराध्यक्ष संतोष नानचे यांची निवड केली आहे.

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनीही मनसेचे नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांना नगराध्यक्ष निवडणुकीत तटस्थ रहावे असा व्हीप बजावला आहे. भाजपचे चार आणि शिवसेना चार  आणि मनसेचा एक नगरसेवक गुरूवारपासून अज्ञातवासात असल्याची माहिती आहे. शुक्रवारी शिवसेनेच्या नगरसेविका सुषमा मिरकर यांनी अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्ष निवडणूक तिरंगी होत आहे. शनिवारी नेमक्या कुठल्या पक्षांचा नगराध्यक्ष बसतो याची उत्सुकता लागून राहिली आहे. भाजप, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांनी आपआपल्या नगरसेवकांना पक्षीय व्हीप बजावला असल्याने तो डावलल्यास अपात्रतेची टांगती तलवार या नगरसेवकांवर आहे. यामुळे हे नगरसेवक नेमकी कोणती भूमिका घेतात हे सुध्दा महत्त्वाचे ठरणार आहे. 

शनिवारी होणार्‍या नगराध्यक्ष निवडणुकीत मनसेचे नगरसेवक  रामचंद्र ठाकुर यांची भूमिका निर्णायक ठरेल. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रांत सुशांत खांडेकर, मुख्याधिकारी वैभव साबळे नगरपंचायत कार्यालयात उपस्थित होते. नगराध्यक्ष निवडणूक  शनिवारी 12.15 वा. सुरू होईल. तर उपनगराध्यक्ष सकाळी 10 ते 12 वा. अर्ज भरणे, 1.45 वा. नंतरही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे नगरपंचायत कार्यालयातून सांगण्यात आले.