Fri, Apr 26, 2019 03:24होमपेज › Konkan › ‘हत्ती हटाव’साठीचे बेमुदत उपोषण सुरूच

‘हत्ती हटाव’साठीचे बेमुदत उपोषण सुरूच

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:12PMदोडामार्ग : प्रतिनिधी

तिलारी खोर्‍यातील हेवाळे गावासह अन्य गावांतील शेतकर्‍यांनी हत्ती हटाव आणि आतापर्यंत झालेली नुकसान भरपाई वाढवून मिळावी, यासाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसर्‍या दिवशी, मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरूच होते. जोवर जबाबदार अधिकारी येऊन ठोस लेखी उत्तर देत नाहीत, तोवर उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे. 

  हत्तीबाधित सात गावांतील  शेतकरी व ग्रामस्थांनी हत्ती हटाव मोहीम व वाढीव नुकसान भरपाईसाठी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सोमवारी सहायक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी उपोषणस्थळी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांना शेतकर्‍यांनी धारेवर धरले. जोवर वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी येऊन ठोस लेखी पत्र देत नाहीत, तोवर आम्ही उठणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मंगळवारी दोडामार्ग वनक्षेत्रपाल श्री. गमरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. सायंकाळी उशिरापर्यंत उपोषण सुरूच होते. मंगळवारी सभापती गणपत नाईक, उपसभापती सुनंदा धर्णे, जि. प. सदस्या अनिशा दळवी, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, पं.स. सदस्य बाबुराव धुरी आदींनी भेट देत उपोषणाला पाठिंबा दर्शविला.