Sat, Jul 20, 2019 15:32होमपेज › Konkan › कोकणातील डी. एड., बी. एड. बेरोजगारांचा 3 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोकणातील डी. एड., बी. एड. बेरोजगारांचा 3 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दोडामार्ग ; प्रतिनिधी

स्थानिक शिक्षक भरती व अन्य मागण्यांसाठी कोकणातील डी. एड., बी. एड. धारक बेरोजगार एकवटलेले आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 3 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात सिंधुदुर्ग बरोबरच कोकण पट्ट्यातील  रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील डी.एड, बी.एड. बेरोजगार सहभागी होणार आहेत.   कणकवली येथे झालेल्या बैठकीत या मोर्च्याचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील डी.एड, बी.एड. बेरोजगारांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात  आला.

गेल्या आठ वषार्ंपासून शिक्षक भरती झालेली नाही. कोकणात डी. एड., बी. एड. धारक असताना शासन विदर्भ, मराठवाडा येथील शिक्षक कोकणात लादू पाहत आहे. 2010 च्या भरती धोरणासारखे अन्यायकारक धोरण नको, जिल्हास्तरावर 70 टक्के आरक्षण स्थानिकांना देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी 3 एप्रिल रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. विदर्भ, मराठवाड्यात घडलेले पटपडताळणीतील गैरप्र्रकार, घोटाळे यामुळे राज्यातील शिक्षक भरती तब्बल आठ वर्षे लांबली आहे. डी.एड., बी. एड. महाविद्यालयांना मोठ्या प्रमाणात मान्यता दिल्याने विदर्भ, मराठवाड्यातील बेरोजगारांची संख्या वाढली.

त्यांचे पुनर्वसन कोकणात करू नका असा इशारा देत स्थानिक स्तरावर शिक्षक भरती करा या मागणीसाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील डी. एड., बी. एड. धारक नोकरीसाठी एकत्र येत आहेत.  2010 पूर्वी शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के आरक्षण होते. परंतु 2010 च्या भरतीत राज्यस्तरावरील शिक्षक भरती करण्यात आल्याने त्याचा फटका कोकणातील तरुणांना बसला. आगामी शिक्षक भरतीत पुन्हा कोकणातील उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून आक्रमक बनले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर  काढण्यात येणार्‍या या मोर्चात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई येथील डी.एड., बी. एड. बेरोजगार धारक सहभागी होणार आहेत. 

 अशा आहेत मागण्या गेली आठ वर्षे रखडलेली शिक्षक भरती सुरू करावी, कोकणातील जिल्हा बदल्यांच्या समस्येवर उपाय म्हणून भरतीत स्थानिकांना 70 टक्के आरक्षण द्यावे, बोलीभाषा शिकवणारे शिक्षक कोकणात असावे, पूर्वीप्रमाणे कोकण निवड मंडळ पुन्हा सुरू करावे, टीईटी परीक्षा रद्द करा, अशा विविध मागण्या संघटनेने केल्या आहेत.
 


  •