Wed, Nov 14, 2018 03:52होमपेज › Konkan › ‘हत्ती हटाव’साठीचे उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरूच

‘हत्ती हटाव’साठीचे उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरूच

Published On: Jun 13 2018 10:32PM | Last Updated: Jun 13 2018 10:07PMदोडामार्ग : प्रतिनिधी

हत्ती पकड मोहीम आणि वाढीव नुकसानभरपाईबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांचे लेखी पत्र मिळाले नसल्याने दोडामार्ग तालुक्यातील शेतकर्‍यांचे बेमुदत उपोषण बुधवारी तिसर्‍या दिवशी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरूच होते.

हेवाळे परिसरातील शेतकर्‍यांनी हत्ती पकड मोहीम राबविण्याच्या. मागणीसाठी सोमवारपासून दोडामार्ग वन विभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आतापर्यंत हत्तींनी केलेली भरपाई वाढवून मिळावी, अशीही या शेतकर्‍यांची मागणी आहे. मात्र, उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी ठोस लेखी पत्र हाती मिळाले नसल्याने शेतकरी आपल्या मागण्यावर ठाम राहिले होते. जोवर वरिष्ठ अधिकारी येत नाहीत व लेखी आश्‍वासन देत नाहीत, तोवर उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.

बुधवारी संध्याकाळी भाजपचे  चिटणीस राजन तेली यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली. मुंबई येथे वनमंत्र्यांची भेट घेवून हत्ती पकड मोहीम  आणि नुकसान भरपाई वाढवून देण्याचा प्रयत्न करू, असे उपोषणकर्त्यांना सांगितले. मात्र, उपोषणकर्त्या शेतकर्‍यांनी त्यांचे आश्‍वासन धुडकावून लावले. सायंकाळी उशिरा जिल्हा उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर उपोषणकर्त्यांच्या मागणी नुसार त्यांनी हत्तीबाधित क्षेत्राला भेट देऊन पहाणी केली.