Sun, Apr 21, 2019 06:11होमपेज › Konkan › दोडामार्ग तहसीलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न

दोडामार्ग तहसीलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न

Published On: Aug 09 2018 10:27PM | Last Updated: Aug 09 2018 9:51PMदोडामार्ग : प्रतिनिधी

दोडामार्ग तहसीलदार यांची बोलेरो गाडी बुधवारी रात्री उशिरा अज्ञातांकडून जाळण्याचा प्रयत्न झाला. पेट्रोलिंगसाठी फिरणार्‍या पोलिसांनी हा प्रकार पाहून गाडीची आग वेळीच विझविल्याने मोठी दुर्घटना टळली. सीसीटीव्ही फुटेज तपासून  संशयितांना  पकडण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, याचे कारण समजू शकले नाही. सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली.

तालुका मुख्यालयाच्या इमारतीत तहसील कार्यालय आहे. प्रवेशद्वारावरच बोलेरो गाडी नेहमीप्रमाणे पार्क करून ठेवण्यात आली होती. राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालयात वर्दळ कमी होती. बुधवारी रात्री उशिरा गाडीच्या पुढच्या टायरवर आणि बॉनेटवर अज्ञातांनी आग लावली. काही क्षणात पेट्रोलिंगसाठी गेलेले पोलिस परत आले आणि गाडीला आग लागल्याचे दिसले. पोलिसांनी तत्काळ आग विझविल्याने पुढील घटना टळली. आपल्या गाडीला अज्ञाताने आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला, अशी रीतसर तक्रार पोलिस ठाण्यात दोडामार्ग तहसीलदार राजेंद्र बिर्जे यांनी दिली आहे. यानुसार पोलिस तपास करीत आहेत.  तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेर्‍यात गाडीला आग लावणारे आरोपी कैद होणार आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिस संध्याकाळी उशिरापर्यंत करत होते.