Wed, Apr 24, 2019 16:04होमपेज › Konkan › डॉक्टरांच्या नियुक्‍तीत रत्नागिरीवर अन्याय

डॉक्टरांच्या नियुक्‍तीत रत्नागिरीवर अन्याय

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 18 2018 8:17PMरत्नागरी :  प्रतिनिधी

ग्रामीण भागात विशेष तज्ज्ञांअभावी प्रसुती दरम्यान होणारे माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आता खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात येत आहे. राज्यातील सुमारे 25 जिल्ह्यातील 101 आरोग्य संस्थांमध्ये 128 खासगी विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची कंत्राटी, अर्धवेळ व ऑन कॉल या पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या नियुक्‍तीमध्ये रत्नागिरी जिल्हा उपेक्षित राहिला आहे. खासगी विशेष डॉक्टरांची नेमणूक केली  असून यामध्ये स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञांचा समावेश आहे. ग्रामीण भागात नियुक्‍ती देऊन देखील डॉक्टर्स कामावर हजर न होण्याचे प्रमाण जास्त आहे.

शासनाच्या आरोग्य संस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात विशेष तज्ज्ञांची उपलब्धता नसल्याने सामान्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देताना अडचणी येतात. बर्‍याचदा काही आरोग्य केंद्रांमध्ये एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांच्यावर रूग्ण तपासणी आणि त्या अनुषंगाने ताण येतो. तर काही ठिकाणी विशेष तज्ज्ञच उपलब्ध होत नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून खासगी विशेष तज्ज्ञांची सेवा शासकीय आरोग्य केंद्रामध्ये घेण्याचा निर्णय झाला. यापूर्वीही खासगी डॉक्टरांची सेवा घेतली जायची आता मात्र त्यांना मानधनाबरोबरच कामानुसार अतिरिक्‍त मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयात रत्नागिरी जिल्हा उपेक्षित राहिला आहे.

या निवड प्रक्रियेत नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, बीड, औरंगाबाद, लातूर, वर्धा, गडचिरोली, सिंधुदूर्ग, रायगड, जळगाव, अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, नाशिक, सांगली, परभणी, अमरावती, हिंगोली, पालघर या जिल्ह्यातील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण तसेच महिला रुग्णालयात या विशेषज्ज्ञांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये रत्नागिरी जिल्हा वगळण्यात आला 
आहे. याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असून याचा पाठपुरावा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.