Wed, Nov 13, 2019 12:06होमपेज › Konkan › सिंधुदुर्गातील प्रस्तावित खनिज प्रकल्पांना मंजुरी देऊ नका

सिंधुदुर्गातील प्रस्तावित खनिज प्रकल्पांना मंजुरी देऊ नका

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 10:59PMसावंतवाडी : दत्तप्रसाद पोकळे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित खनिज प्रकल्पांना मंजुरी देवू नका, अशी महत्त्वपूर्ण सूचना संयुक्‍त राष्ट्र संघाच्या निसर्ग संवर्धन समितीने केंद्र शासनास केली आहे. या घडीला सिंधुदुर्गच्या प.घाट क्षेत्रात खनिज उत्खनन सुरू नसले तरी भविष्यात काही खनिज प्रकल्पांना मंजुरी मिळू शकते,असे या समितीने अलीकडेच प्रसिध्द केलेल्या आउटलूक-2 या अहवालात नमूद केले आहे. या अहवालाच्या माध्यमातून प्रथमच धोकादायक श्रेणीच्या वर्गवारीत प.घाटाचा समावेश करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या राधानगरी अभयारण्याला युनेस्कोने हेरीटेजचा दर्जा दिला आहे. याचे स्मरण ठेवावे, असेही या अहवालात बजावण्यात आले आहे. राज्यातील चारही हेरिटेज स्थळांना खनिज उत्खननाचा धोका आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयर्न ओर व कोल्हापूरमधील बॉक्साईट उत्खनन या वारसास्थळांना हानी पोहचवू शकते,असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सहयाद्रीतील 4 प्राकृतिक क्षेत्रांसह प.घाटातील 39 स्थळांना युनोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तसेच विकास प्रकल्पांच्या दबावामुळे सध्या ही 39 वारसा स्थळे धोक्याच्या उंबरठ्यावर आहेत,असा इशाराही या अहवालातून देण्यात आला आहे.

युनोच्या निसर्ग संवर्धन समितीने(आययूसीएन) काही दिवसांपूर्वी जागतिक वारसा स्थळ तसेच जगातील प्राकृतिक क्षेत्रांच्या स्थितीचा आढावा घेणारा  आउटलूक-2 हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.या अहवालात प.घाटाच्या सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्‍त करण्यात आली आहे. युनोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेली 39 स्थळे धोकादायक स्थितीत आहेतच. त्याचबरोबर संपूर्ण प.घाट चिंतेचे कारण बनला आहे, असे या अहवालात म्हटले आहे. प.घाटात मोठ्या प्रमाणात जैवसंपदा टिकून असलेल्या क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येचा दबाव गंभीर बनला आहे. यासाठी दीर्घकालीन उपाय योजना आखण्याची गरज आहे. प.घाटाला सर्वाधिक धोका मायनिंगचा असून या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिज प्रकल्पांचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळणे मायनिंगसह प्रस्तावित खनिज प्रकल्पांचा मुद्दा देशपातळीवर गाजला होता. जिल्ह्यातील एकूण 52 खनिज प्रकल्पांपैकी 49 प्रकल्प हे सह्याद्रीच्या पट्ट्यात प्रस्तावित आहेत. यावर प्रथमच युनोच्या पातळीवर दखल घेऊन चिंता व्यक्‍त करण्यात आली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिज प्रकल्प हे जैवसंपदेचे नुकसान करणारे असून यातील काही प्रकल्प  हेरिटेज साईटचा दर्जा दिलेल्या क्षेत्रानजीक आहेत याचे भान ठेवा, असे बजावतानाच सिंधुदुर्गच्या प.घाट क्षेत्रात सध्या खनिज उत्खनन सुरू नसले तरी भविष्यात काही खनिज प्रकल्पांना मंजुरी मिळू शकते. मात्र, या मंजुरीवर विचार करा, असेही या समितीने सुचविले 
आहे.