Fri, Mar 22, 2019 22:44होमपेज › Konkan › गणपतीपुळेत जिल्हास्तर सरस प्रदर्शन

गणपतीपुळेत जिल्हास्तर सरस प्रदर्शन

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 10:06PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

तालुक्यातील देवबाग परिसर, गणपतीपुळे येथे प्रतिवर्षाप्रमाणे दि. 23 ते 27 डिसेंबर या कालावधीत सरस विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा 75 स्टॉल्स उभारण्यात येणार असून, राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत यांनी बुधवारी दिली.

स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना/महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादीत मालाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी प्रतिवर्षी जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन आयोजित करण्यात येतात. या प्रदर्शनातून ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू, घरगुती मसाले, घरगुती चवीचे कोकणी खाद्यपदार्थ, कोकणी मेवा, सेंद्रीय खते, विविध फळांची सरबते, रस, सिरप, सुगंधी अगरबत्‍ती, विविध प्रकारच्या पर्स, लेडिज गारमेंट, नर्सरी, चप्पल/बूट इ. ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. नाताळच्या सुट्टीत प्रदर्शन असल्याने येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील, असा विश्‍वास व्यक्‍त होत आहे. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन 23 रोजी दुपारी 2 वाजता केंद्रीयमंत्री अनंत गीते यांच्याहस्ते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, जि.प.अध्यक्षा स्नेहा सावंत खासदार हुसेन दलवाई, खासदार विनायक राऊत, विधान परिषद सदस्य हुस्नबानू खलिफे, अलिन तटकरे, निरंजन डावखरे, बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. यामध्ये सहभागी स्वयंसहाय्यता समुहांतील सदस्यांना आरोग्याची प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दि. 25 रोजी पाककला स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जि. प. अध्यक्षा स्नेहा सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. पनवेलकर यांनी केले आहे.