Wed, Mar 27, 2019 06:01होमपेज › Konkan › मराठा आरक्षणासाठी  3 रोजी जिल्हा बंद

मराठा आरक्षणासाठी  3 रोजी जिल्हा बंद

Published On: Jul 31 2018 10:34PM | Last Updated: Jul 31 2018 10:33PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने 3 ऑगस्ट रोजी ‘जिल्हा बंद’ची हाक दिली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात रस्त्यावर उतरून मराठा बांधव या बंदमध्ये सहभागी होणार असून ठिकठिकाणी रास्ता रोको  केला जाणार आहे. 

कोपर्डी अत्याचार आणि अमानुष खुनानंतर राज्यातील मराठा बांधव एकत्र आले. बहिणीला न्याय आणि मराठा समाजाला आरक्षण हे दोन मुद्दे घेऊन मराठा समाजाने राज्य शासनाकडे हक्‍काची मागणी केली. याचसाठी महाराष्ट्र पेटला असून मराठा तरुण आक्रमक झाला आहे. ‘मराठा क्रांती मोर्चा’ आता ‘मराठा ठोक मोर्चा’ झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर  जिल्ह्यात मराठा बांधव एकाच दिवशी, एकाच वेळी एकत्र येण्यास सज्ज झाले आहेत. त्याचेच नियोजन करण्यासाठी मंगळवारी रत्नागिरी शहरातील मराठा मैदानावरील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी माजी खा. नीलेश राणे यांच्यासह मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष केशवराव इंदूलकर, प्रताप सावंत-देसाई, भाऊ देसाई, संतोष तावडे,  सुनील साळवी, हरिश्‍चंंद्र देसाई, काकी नलावडे यांच्यासह मराठा समाजातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.  3 ऑगस्टला ‘जिल्हा बंद’ची हाक मराठा समाजातर्फे देण्यात आली आहे. या बंदला जिल्हाही पाठिंबा देईल, असा विश्‍वास मराठा समाजातर्फे व्यक्‍त करण्यात आला आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या नीलेश राणे यांनी मनोगत व्यक्‍त करताना एकत्र येऊन आपल्या आंदोलनाचे नियोजन करू, असे उपस्थितांना आवाहन केले. सर्व समाजाने आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, व्यापारी व अन्य क्षेत्रानेही यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. काकी नलावडे यांनी आंदोलन कोकणाला साजेसे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. पाली येथील सचिन सावंत यांनी खंत व्यक्‍त करताना सांगितले की, आम्ही काही दिवसांपूर्वी महामार्गावर आंदोलन केले, संपूर्ण जिल्ह्यात फक्‍त पालीतीलच आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. परंतु, समाजाचे चार आमदार जिल्ह्यात असूनही एकानेही आम्हाला पाठिंबा दिला नाही. आज आरक्षणावरून समाजाने एकत्र येणे गरजेचे असून तीच एकी सर्वत्र दिसली पाहिजे, अशीही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी दिलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले. त्यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्‍त केला. या बैठकीला तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.