Sat, Apr 20, 2019 08:45होमपेज › Konkan › महाराष्ट्र दिनी जिल्हा बँकेच्या तीन नव्या योजना 

महाराष्ट्र दिनी जिल्हा बँकेच्या तीन नव्या योजना 

Published On: Apr 25 2018 10:41PM | Last Updated: Apr 25 2018 9:17PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशस्त इमारतीचे उद्घाटन 1 मे रोजी सकाळी 10 वा. माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नावीन्यपूर्ण तीन योजनांचा शुभारंभ राणेंच्या उपस्थितीत केला जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष सावंत बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, कर्ज विभागाचे व्यवस्थापक प्रमोद गावडे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

सतीश सावंत म्हणाले, जिल्हा बॅकेच्या शंभर शाखा आहेत. ठिकठिकाणी 40 एटीएम मशीन कार्यरत आहेत. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे.त्यामुळे या बँकेला एका भव्य इमारतीची गरज होती. त्यामुळेच पाच वर्षांपूर्वी ही भव्य वास्तू उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज ही भव्यदिव्य अशी इमारत उभी राहिली असून त्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व खा.नारायण राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी होणार आहे. यावेळी आमदार तथा  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, माजी आमदार तथा पद्मश्री डॉ.डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील, माजी खा. निलेश राणे, आ.नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत उपस्थित राहणार आहेत. याचवेळी जिल्हा बँकेच्या नावीन्यपूर्ण अशा तीन योजनांचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 1227 जिल्हा बँकेची सभासद संस्था व 226 शेती सभासद संस्था कार्यरत आहेत. भविष्यात शेतकर्‍यांसह गरजूंना चांगली सेवा देण्यासाठी प्रशस्त इमारतीची गरज होती. इमारत उद्घाटनाला बँकेचे ठेवीदार, कर्जदार, सर्व सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.