Sun, Aug 25, 2019 04:28होमपेज › Konkan › जिल्हा-तालुका  विभाजनाच्या हालचाली

जिल्हा-तालुका  विभाजनाच्या हालचाली

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 10:24PMरत्नागिरी : प्रतिनिधी

लोकसंख्येने आणि आकाराने मोठ्या असलेल्या जिल्हा, तसेच तालुक्याचे विभाजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या दोन स्वतंत्र समित्यांकडून सरकारला अहवाल प्राप्त झाले असून या अहवालांचा अभ्यास करून त्यातील निष्कर्षांच्या आधारे जिल्हा, तालुका विभाजनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये कोकण विभागाचाही समावेश असून  रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड जिल्हा व रत्नागिरी तालुक्यातील पाली तालुका स्वतंत्र करण्याचा प्रस्ताव  विचाराधीन आहे.

राज्य सरकारने तालुका आणि जिल्हा विभाजनाबाबत दोन समित्या नेमल्या होत्या. त्यानुसार नेमण्यात आलेल्या विभागीय आयुक्‍त जे. पी. गुप्ता यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा अभ्यास करून अहवाल सादर केला. तर तालुक्यांच्या संदर्भात अनुपकुमार यांची समिती नेमण्यात आली होती. या दोन्ही समित्यांचा अहवाल सरकारला सादर झाला असून आता महसूल विभागातर्फे अभ्यास करून निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. अधिवेशनानंतर जिल्हा, तालुका विभाजनाला गती देण्यात येईल. नवे जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीसाठी कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. शासनाने अलीकडेच पाच हजार नवे सज्जे निर्माण केले. 

त्यामुळे राज्यातील सज्जांची संख्या 13 वरून 18 हजार इतकी झाली आहे. याशिवाय काही तालुक्यांत उपविभाग निर्माण करण्यात आले आहेत. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केली. मात्र, नागरिकांची मागणी असूनही अनेक जिल्ह्यांचे निर्णय झालेले नाहीत.