Tue, Jul 16, 2019 10:01होमपेज › Konkan › जि. प. चे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर

जि. प. चे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर

Published On: Sep 04 2018 11:38PM | Last Updated: Sep 04 2018 10:24PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार मंगळवारी शिक्षकदिनाच्या पूर्वदिनी  जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी जाहीर केले. हे पुरस्कार 10 सप्टेंबर रोजी या शिक्षकांना समारंभपूर्वक वितरित करण्यात येणार आहेत. पुरस्कारप्राप्त आठही आदर्श शिक्षकांचा आनंद गणेश चतुर्थीनिमित्त द्विगुणित होणार आहे.

सिंधुदुर्ग जि. प. च्या वतीने दरवर्षी आठ तालुक्यांतील आठ प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून हे पुरस्कार जाहीर केले जातात. सन 2018 चे आदर्श शिक्षक पुरस्कार मंगळवारी जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी जाहीर केले. उपाध्यक्ष रणजित देसाई, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, प्रभारी शिक्षणाधिकारी भारती संसारे, सर्व शिक्षा अभियांच्या समन्वयक स्मिता नलावडे, विनायक पिंगुळकर आदी उपस्थित होते.

 सौ. रेश्मा सावंत म्हणाल्या,  प्रत्येक तालुक्यातून तीन प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामुळे एकूण 24 प्रस्ताव प्राप्त झाले होते. या 24 प्रस्तावांतून हे आठ शिक्षक निवडण्यात आले आहेत. या पुरस्कार निवड समितीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती , मुख्य कार्यकारी अधिकारी, डाएटचे प्राचार्य, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचा समावेश होता.या पुरस्काराचे वितरण 10 सप्टेंबरला जि. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, मानपत्र, मानचिन्ह व रोख रक्कम असे आहे.

या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक इनक्रिमेंट मिळावी, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच आदर्श शिक्षकांची एक वेगळी ओळख राहावी यासाठी जिल्हा परिषदेकडून त्यांना एक बॅच देण्यात येणार आहे. तो लावल्यामुळे हे आदर्श शिक्षक कोठेही गेल्यास त्यांची एक वेगळी ओळख राहू शकेल, असेही यावेळी सौ सावंत यांनी स्पष्ट केले.

10 सप्टेंबरला होणार्‍या पुरस्कार वितरण समारंभात राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्राथमिक शिक्षक श्यामसुंदर सावंत (पोखरण नं-1) व  संतोष वालावलकर-माध्यमिक शिक्षक जामसंडे हायस्कूल यांचाही सत्कार करण्यात येणार असल्याचेही अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी सांगितले.जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये आठपैकी सहा शिक्षिका आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्गातील स्त्री शक्तीचे महत्व अधोरेखीत झाले आहे.