Thu, Apr 18, 2019 16:04होमपेज › Konkan › ‘पडिक जमीन विकास’ कर्ज योजना शेतकर्‍याला बळ देणारी : शरद पवार

‘पडिक जमीन विकास’ कर्ज योजना शेतकर्‍याला बळ देणारी : शरद पवार

Published On: May 28 2018 1:41AM | Last Updated: May 27 2018 10:17PMओरोस : प्रतिनिधी

पडीक जमीन विकास कर्ज योजना बँकेचा उपक्रम शेतकर्‍याला आर्थिक  समृद्ध करणारा आहे. काजू पिक लागवडीबरोबर बांबूमधील महत्त्वाच्या जाती   विकसीत करुन अशा पडीक जमिनीवर त्याची लागवड केल्यास जिल्ह्यात हरितक्रांती निर्माण होण्यास जिल्हा बँकेची मदत होईल, असा विश्‍वास माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्‍त केला. जिल्हा बँकेच्या ‘पडिक जमीन विकास’ कर्ज योजना उपक्रम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी रविवारी सिंधुदुर्ग  बँकेच्या प्रधान कार्यालयाला भेट दिली. या निमित्त जिल्हा बँकेच्या ‘पॉझ’ मशीनचा शुभारंभ आणि पडिक जमिन विकास कर्ज योजनेचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते झाला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत,  आ. अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, अविनाश माणगांवकर, प्रसाद रेगे, आत्माराम ओटवणेकर,  विकास सावंत, नीता राणे, अबिद नाईक, बँकेचे सरव्यवस्थापक अनिरूध्द देसाई, प्रमोद धुरी आदींसह मान्यवर,लाभार्थी  शेतकरी उपस्थित होते. 

प्रारंभी शरद पवार यांचे जिल्हा बँकेच्यावतीने आम्रतुला घालून व घोंगडी देऊन स्वागत करण्यात आले.  शरद पवार म्हणाले, शून्य एनपीए असलेल्या सहकारी बँकांमध्ये सिंधुदुर्ग बँकेचा प्रथम  क्रमांक आहे. येथील कर्जदार शेतकर्‍याला कर्ज वेळेत भरण्याची सवय आहे. कर्ज थकीत प्रमाण कमी आहे. राज्यातील अन्य बँकांची कामगीर पाहिल्यास सिंधुदुर्ग बँकेचे हे  यश प्रेरणादायी ठरतेख असे गौरवोद‍्गार शरद पवार यांनी काढले.  

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना बांबू पिकाची महत्त्वाची परिषद दिल्ली येथे पार पडली होती. त्या परिषदेच्या चर्चासत्रात 110 बांबूच्या वेगवेगळ्या जाती ठेवल्या होत्या. माणगासारख्या अन्य जातीच्या पिकाचे योग्य माहिती घेऊन येथील शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिल्यास हरितक्रांती घडविण्याचे महत्त्वाचे पाऊल बँकेच्या मदतीने पुढे येईल, असा विश्‍वास शरद पवार यांनी व्यक्‍त केला. 

प्रास्ताविक भाषणात सतीश सावंत म्हणाले, रोजगार हमी योजनेंतर्गत 5 एकर मर्यादेत फळझाड लागवड योजना आहे. परंतू त्यापेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळत नाही. जिल्ह्यात 85 हजार हेक्टर क्षेत्र पडिक आहे. त्यांच्यासाठी आंबा, काजू व बांबू लागवड योजना राबविण्यासाठी बँकेमार्फत कर्ज पूरवठा योजना लागू करण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला होता.

त्या निर्णयानुसार शरद पवार यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे. 1990  नंतर फळझाड लागवडीतून हरितक्रांती पडिक जमिनीचा विकास करण्यासाठी बँकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यातील काही लाभार्थी शेतकर्‍यांना कर्ज मंजूरीचे पत्र वितरीत केले जात आहे. तसेच कुक्कुटपालन सारखी योजना राबविण्यावर बँकेचा भर असल्याचे सतीश सावंत म्हणाले.  आभार संचालक व्हिक्टर डान्टस यांनी मानले.