Mon, Apr 22, 2019 16:00होमपेज › Konkan › जिल्हा बँक दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

जिल्हा बँक दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 12 2018 10:28PMरत्नागिरी  : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेत्रदीपक प्रगतीची नोंद राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आली असून ‘बँकिंग फ्रंटियर्स’ या नामांकित संस्थेमार्फत ‘बेस्ट क्रेडिट ग्रोथ’ व बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे यांना ‘सर्वोकृष्ट जिल्हा बँक अध्यक्ष’ म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. नुकतेच हे पुरस्कार नवी दिल्ली येथे एका भव्य सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्य सहकारी बँकेच्या क्षेत्रात एक उत्कृष्ट काम करणारी बँक म्हणून गेल्या काही वर्षात नावारूपास आली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र शासन तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांकडून बँकेला सहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यामध्ये एक अग्रणी बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक नावारूपास आली आहे. बँकेच्या या वित्तीय प्रगतीची शेतकरी व सर्वसामान्य कर्जदार यांच्याशी आपुलकीचे नाते जोडणारी म्हणून या बँकेचा नावलौकिक आहे. या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून तानाजीराव चोरगे यांनी पदभार स्वीकारल्यापासून या बँकेला उर्जितावस्था आली. त्याची दखल राष्ट्रीय पातळीवरील ’बँकिंग फ्रंटियर्स’ या संस्थेमार्फत घेण्यात आली असून अध्यक्ष चोरगे यांना ‘बेस्ट चेअरमन’ व बँकेला ‘बेस्ट  क्रेडिट ग्रोथ’ पुरस्कार 2017 - 18 चा जाहीर झाला होता. 

नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या एका भव्य सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी देशभरातील बँकांचे सुमारे 500 ते 600 प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, कार्यकारी संचालक जीवन गांगण, बँकिंग फ्रंटियर्सचे पदाधिकारी, बँकेचे संचालक व बँकिंग क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. चोरगे यांनी 10 वर्षे बँकेच्या प्रगतीसाठी संघर्ष करून बँकेला यशोशिखरावर पोहोचविण्यास मोठे योगदान दिले आहे. बँकेला स्वतःचा भरपूर वेळ देऊन सर्व सभासद व संचालक मंडळ यांना विश्‍वासात घेऊन कर्मचार्‍यांना कामाची योग्य दिशा दाखवून बँकेला प्रगतीपथावर नेण्यासाठीही त्यांनी योगदान दिले आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्राहक व सभासद यांचेही त्यांनी चांगले सहकार्य मिळविले व बँकेशी अतूट नाते जोडले आहे. याची दखल घेऊनच बँकेने राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळवून देशातील एक नामांकित बँक म्हणून नाव कमाविले आहे.