Mon, Jun 24, 2019 21:02होमपेज › Konkan › शरद पवार यांच्याकडून जिल्हा बँकेचा गौरव

शरद पवार यांच्याकडून जिल्हा बँकेचा गौरव

Published On: May 29 2018 1:37AM | Last Updated: May 28 2018 9:58PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराचा आणि कार्याचा गौरव केला आहे. शेती आणि शेतीपूरक छोटया उद्योगांना कर्ज देवून बँक सामान्य शेतकरी, मच्छिमार, उद्योजक, बेरोजगार तरूण यांना आर्थिक समृद्धीकडे नेत आहे, याबाबत त्यांनी आनंद व्यक्‍त केला. त्याचवेळी बँकेच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्‍त केले. शरद पवार यांनी बँकेला भेट देवून बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, व्हिक्टर डान्टस, सर्व संचालक आणि अधिकारी, कर्मचार्‍यांचे चांगल्या कारभाराबद्दल कौतुक केल्यामुळे जिल्हा बँकेमध्ये सोमवारी उत्साहाचे वातावरण होते. 

रविवारी माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांच्या लाईफ टाईम हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी शरद पवार सिंधुदुर्गनगरीत आले होते. शरद पवार हे सिंधुदुर्गनगरीत येत आहेत, हे लक्षात आल्यानंतर अध्यक्ष सतीश सावंत आणि संचालक मंडळाने शरद पवार यांना बँकेत येण्याची विनंती केली. पडीक जमीन विकास योजनेचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते केले. सिंधुुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये स्वाभिमान आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्‍ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.

सहकार क्षेत्रात भरीव काम केलेल्या शरद पवार यांच्या सूचना बँकेसाठी महत्त्वाच्या होत्या. काजू, बागांमध्ये बांबू लागवड करण्यासाठी कर्ज पुरवठा करण्याची सूचना पवार यांनी यावेळी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत व उपसंचालक मंडळ यांना दिली. सुरेश दळवी, व्हिक्टर डान्टस, स्वाती मर्गज, निता राणे, भाजपचे अतुल काळसेकर, काँग्रेसचे विकास सावंत, प्रमोद धुरी, आत्माराम ओटवणेकर, विद्याप्रसाद बांदेकर आदी बँकेचे संचालक तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी अनिरूद्ध देसाई, बँकेचे अधिकारी रामदास रासम, आनंद सावंत, प्रमोद गावडे, बोर्ड अधिकारी सामंत, एकनाथ तावडे व इतर अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

मच्छीमारांना त्यांच्या व्यवसायासाठी, व्यापार्‍यांना, छोटया शेतकर्‍यांना, लहान उद्योजकांना विविध योजनांखाली जिल्हा बँक कर्ज देते आहे आणि त्यांना आर्थिक समृद्धीसाठी मदत करते आहे, याबद्दल शरद पवार यांनी विशेष आनंद व्यक्‍त केला. नोटाबंदीच्या काळात  राज्यातील इतर जिल्हा बँकांनी तत्परता दाखवली नाही. परिणामी त्यांना जुन्या नोटा सरकारने जमा करून घ्याव्यात, यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागली.

मात्र, जिल्हा बँकेने त्यावेळच्या जिल्हाधिकार्‍यांची मदत घेवून तसेच स्टेट बँकेच्या अधिकार्‍यांची मदत घेवून सर्व 91 कोटीच्या जुन्या नोटा बदलून घेतल्या. त्यामुळे नोटाबंदीच्या काळात बँकेला त्रास झाला नाही. या तत्परतेचेही शरद पवार यांनी कौतुक केले. ही एकमेव अशी जिल्हा बँक आहे की, तीचा एनपीए शून्य टक्के आहे. बँकेच्या या कारभाराबद्ल त्यांनी समाधान व्यक्‍त केले. शेतकर्‍यांचे जे काही प्रश्‍न असतील ते सरकार दरबारी मांडून आपण सोडवून घेवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. शरद पवार यांच्या भेटीनंतर व त्यांनी मारलेली कौतुकाची पाठीवरील थाप बँकेच्या अध्यक्ष व संचालक मंडळ तसेच प्रशासनाला प्रेरणा देणारी ठरली.