Tue, Apr 23, 2019 13:56होमपेज › Konkan › दळे ग्रामपंचायतीच्या सभेतच महिलांना धक्‍काबुक्‍की

दळे ग्रामपंचायतीच्या सभेतच महिलांना धक्‍काबुक्‍की

Published On: Jun 01 2018 2:06AM | Last Updated: May 31 2018 8:30PMराजापूर : प्रतिनिधी

दळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत होळी नळपाणी योजनेवरुन मोठा संघर्ष होऊन त्याची परिणती हाणामारीत झाल्याची घटना घडली. यामध्ये काही महिलांना शिवीगाळीसह  मारहाण करण्यात आली तर त्या मारामारीत  तीन महिलांची मंगळसूत्रे लंपास  झाली. मात्र, एवढा प्रकार होऊनदेखील नाटे पोलिस ठाण्यात साधा अदखलपात्र गुन्हा दाखल करुन घेण्यात आल्याने पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी  व्यक्‍त करण्यात आली आहे.

बुधवार दि. 30 मे रोजी दुपारी 3.30 वाजता  तालुक्यातील दळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजीत करण्यात आली होती. त्याला ग्रामस्थांची उपस्थिती होती. सभेतील विविध विषयांवर चर्चा सुरु असताना यापूर्वी वादग्रस्त ठरलेल्या होळी नळपाणी योजनेचा मुद्दा सभेत उपस्थित झाला व त्यावरुन जोरदार संघर्ष पेटला.गेले दोन वर्षांहून अधिक काळ होळी नळपाणी योजनेवरुन सुरु असलेला वाद राजापूरचे सभापती व गटविकास अधिकार्‍यांनी मिटवला होता.

तरी तो  प्रश्‍न जाणूनबूजून ग्रामसभेत उकरुन काढला गेला.  त्यावरुन  ग्रामस्थांमध्ये शाब्दीक जुंपली. सुरु झालेला  वाद मुद्यावरुन गुद्यावर आला. संतापलेले  ग्रामस्थ एकमेकांना भिडले. सभेत अचानक आलेल्या वादग्रस्त विषयावर बोलणार्‍या काही महिलांना तर धक्‍काबुक्‍की करण्यात आली. काहींना मारहाण झाल्याची उपस्थित महिलांनी माहिती दिली. त्यामध्ये तीन महिलांची  मंगळसूत्रे तुटुन ती लंपास करण्याचे प्रकार घडले. महिलांना शिवीगाळ देखील करण्यात आली.

या प्रकारानंतर नाटे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावेळी महिलांना मारहाण करणार्‍या दहा ते बारा जणांची नावेदेखील देण्यात आली पण प्रत्यक्षात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करताना केवळ दोघाजणांविरुद्धच तक्रार घेतली, अशी माहिती त्या घटनेनंतर ग्रामस्थांनी पत्रकारांना दिली. शासनाने ग्रामसभांना व्यापक अधिकार दिले असताना त्या सभेत  चर्चेसाठी सहभागी होणार्‍या महिलांना मारहाण होणे ही गंभीर बाब आहे. त्याकडे गांभीर्याने न पाहिले गेल्याने नाटे पोलिस स्टेशनबाबत संताप व्यक्‍त होत आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पातळीवर प्रकरण नेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.