Sun, Jun 16, 2019 12:10
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › दोन मच्छीमार संघटनांत उसळताहेत मतभेदाच्या लाटा

दोन मच्छीमार संघटनांत उसळताहेत मतभेदाच्या लाटा

Published On: Jun 04 2018 1:04AM | Last Updated: Jun 03 2018 9:04PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

पावसाळ्यातील मासेमारी बंदी सुरू झाल्यानंतर मच्छिमारांच्या दोन संघटनांमधील मतभेदांच्या लाटा मात्र उसळू लागल्या आहेत. यातील एका संघटनेमुळे मच्छिमारांचे दीड-दोन महिन्यांचे नुकसान कसे झाले याचे अनुभव मच्छिमार एकमेकांना सांगू लागले आहेत. संघटनांमधील वादातून पहिल्या संघटनेत फाटाफूट कशी झाली याच्याही सुरस कथा सांगितल्या जाऊ लागल्या आहेत.

जिल्ह्याची मच्छिमार संघटना असताना दुसरी तालुका संघटना स्थापन झाली. ही तालुक्याची दुसरी संघटना आक्रमकपणे काम करू लागली. त्यानंतर मासेमारीसाठी बोटीवर एलईडी लाईट न वापरण्याबाबतही ठाम भूमिका मांडू लागली. या पार्श्‍वभूमीवर पहिल्या संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. या संघटनेच्या काही पदाधिकार्‍यांनी दोन्ही संघटना एकत्र करून दोन्ही बाजूचे समसमान पदाधिकारी नेमण्याचा फॉर्म्युला ठेवला होता.

एलईडी मासेमारीबाबत पहिल्या संघटनेतील काहींनी दुसर्‍या संघटनेला आक्रमक भूमिका न घेण्याची विनंती केली. परंतु, दुसर्‍या संघटनेच्या काही पदाधिकार्‍यांनी ही विनंती धुडकावून लावली आणि शक्य ते कौशल्य वापरून एलईडी वापरावर कारवाई करण्यास भाग पाडले. त्यामुळे पहिल्या संघटनेतील काही पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचे राजीनामेसुद्धा दिले. त्याचबरोबर एलईडी विरोधात भूमिका घेतल्याने दीड-दोन महिन्यात किती नुकसान झाले याचा लेखाजोखा मांडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

पावसाळ्यातील मासेमारी बंदी सुरू झाल्यानंतर मच्छिमारांच्या दोन संघटनांमधील गुप्त घडामोडी आता बाहेर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे मासेमारी सुरू झाल्यानंतर या घडामोडींचा परिणाम आणखी तीव्रपणे उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.